शिवाजी विद्यापीठाने घेतले बसर्गे गाव दत्तक
By admin | Published: May 22, 2017 04:39 PM2017-05-22T16:39:28+5:302017-05-22T16:41:19+5:30
पाणी वाचविण्याचे आवाहन : श्रमदानातून ११0 ट्राली काढला गाळ
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २२ : मुनिजन योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाने गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे हे गाव दत्तक घेतले असल्याची घोषणा कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी घोषणा केली. उपस्थित शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना संबोधित करताना नांदवडेकर यांनी पाण्याचे महत्व वेळीच ओळखून त्याचे बचत करण्याचे आवाहन केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार व जलसंधारण शिबिरात ते बोलत होते.
एन.एस.एस.च्या माध्यमातून बसर्गे गावाचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून या गावाचा कायापालट करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दि. १६ ते २२ मे २०१७ या कालावधीत झालेल्या या शिबिरामध्ये बसर्गेच्या ओढ्यावरील मुख्य बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आले तसेच सर्व प्रभागामधील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी योगवर्ग, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले होते.
पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ संचालक व बसर्गे गावचे सुपुत्र डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी बसर्गे ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याविषयी आश्वस्त केले.
या विशेष शिबिरामध्ये एन.एस.एस.चे स्वयंसेवक, एस. एम. हायस्कुलचे विद्यार्थी, महिला बचत गट सदस्य, ग्रामस्थ या सर्वांच्या श्रमदानातून एकशे दहा ट्रॉली गाळ काढण्यात आला आणि ग्रामस्वच्छता करण्यात आली.
या शिबिरामध्ये महागावचे प्रा. पी. डी. पाटील यांचे "थोडं तरी जगावे समाजासाठी", उत्तूरचे प्रा. राजेंद्र ठाकूर यांचे "स्वातंत्रवीर सावरकरांचा राष्ट्रवाद", कोल्हापूरचे डॉ. अभिजित मुसळे यांनी "ताणतणावमुक्त जीवन" आणि गारगोटीच्या केतकी पाटकर - ठाकूर यांनी मुलाखतीच्या माध्यमातून "उद्योगातून महिला सबलीकरण" याविषयी मार्गदर्शन केले.
गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती प्रा. जयश्री तेली, गटविकास अधिकारी सीमा जगताप, पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस, जिल्हापरिषद सदस्य हेमंत कोलेकर, रेखाताई हत्तरकी, वषार्देवी नाडगोंडे, गंगाधर व्हस्कोटी यांनी शिबिरात भाग घेतला. शिबिराचे व्यवस्थापन प्रा.संजीवनी पाटील, प्रा. डी. जी. चिंगळीकर, सेवावर्धिनी संस्थेचे गुरुनाथ कुलकर्णी, अनुलोम संस्थेचे विजय हिरेमठ यांनी केले. बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या शिबिरात सहभाग घेतला.
बसर्गे गावचे संकेतस्थळ तयार करणार
याप्रसंगी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठ व ए बी सॉफ्टच्या सहकार्यातून बसर्गे गावाचे संकेतस्थळ तयार करणार असल्याचे जाहीर केले.
वर्षभरात गावात डिजिधन, जनधन, प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल बिमा योजना, ठिबक सिंचन, जलसंधारण, विहीर पुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी योजनांविषयी जनजागरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. डी. के. गायकवाड,
मुख्य समन्वयक,
राष्ट्रीय सेवा योजना विभाग