कागलमधील राम मंदिराची वास्तुशांती

By admin | Published: March 11, 2016 12:28 AM2016-03-11T00:28:19+5:302016-03-11T01:10:08+5:30

महोत्सवाचा दुसरा दिवस : मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा गारवा घेऊन महिलांची गर्दी

Vaastu Shanti of Ram Mandir in Kagal | कागलमधील राम मंदिराची वास्तुशांती

कागलमधील राम मंदिराची वास्तुशांती

Next

कागल : येथील श्रीराम मंदिराचा वास्तुशांती सोहळा गुरुवारी धार्मिक विधीने झाला. गल्लोगल्लीतून वाजतगाजत आणलेला गारवा आणि मंत्रोच्चारात ‘श्रीं’च्या मूर्तीचे पूजन यामुळे दिवसभर वातावरण मंगलमय होते. या प्रतिष्ठापना सोहळ्याचा गुरुवारी दुसरा दिवस होता.गुरुवारी वास्तुशांतीचा सोहळा असल्यामुळे मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या उत्सवमूर्तींची विधिवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला. श्रीमंत प्रवीणसिंहराजे, समरजितसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, नंदितादेवी घाटगे, नवोदितादेवी घाटगे या राजपरिवारासह विविध मान्यवरांनी या पूजेत सहभाग घेतला.
कणेरी मठाचे स्वामी अदृश काडसिद्धेश्वर महाराज, भूपीन महाराज यांच्या हस्ते हे धार्मिक विधी झाले. सकाळी नऊ वाजल्यापासून हलगी, घुमके, बँण्ड पथक, भजनी मंडळांच्या समवेत महिला डोक्यावर गारव्याच्या दुरड्या व सजविलेल्या अंबिलीच्या घागरी घेऊन मंदिराकडे येत होत्या. गारव्यामध्ये अंबीलबरोबरच ज्वारीच्या भाकरी, पुरणपोळी, सोजीच्या पोळ्या, बुंदीचे लाडू, केळी, घुघऱ्या, दहीभात, कोर्ट्याची चटणी, पातीची भाजी, आंबाड्याची भाजी, मोकळे पिठले, लोणचे, असा विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा समावेश होता. गुरुवारी दिवसभर उत्साही वातावरणात या नव्या वास्तूचा वास्तुशांती सोहळा पार पडला.


‘गीतरामायण’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीधर फडके यांचा ‘गीतरामायण’ हा कार्यक्रम बुधवारी (दि. ९) सायंकाळी झाला. त्याला कागलसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन समरजितसिंह घाटगे यांनी केले. श्रोते अडीच तास तल्लीन झाले होते. नगराध्यक्षा संगीता गाडेकर, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी उपस्थित होते. गायक श्रीधर फडके यांनी मंदिर उभारणीच्या कामाबद्दल घाटगे परिवार आणि समितीचे कौतुक केले.
गारवा अर्पण
महिलांचे हे जथ्थे दुपारी १२ वाजेपर्यंत येत होते. मंदिराच्या हॉलमध्ये गारवा अर्पण केला जात होता. त्यानंतर या दुरड्या, घागरीमधील अंबील, आदी खाद्यपदार्थ येथील शाहू सभागृहात नेले जात होते. तेथे दिवसभर जेवणाच्या पंगती सुरू होत्या.

कागलचे राम मंदिर
प्रतिष्ठापना सोहळा
आजचे कार्यक्रम
तीन दिवसांच्या या सोहळ्याचा आज, शुक्रवारी मुख्य दिवस आहे. मुख्य कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम, पूर्णाहुती यज्ञ, महापूजा होणार आहे. विविध मान्यवर व्यक्ती आज उपस्थित राहणार आहेत.
दुपारी चार ते सहा वाजता शहरातील महिला सामुदायिक रामरक्षा पठण करणार आहेत.
सायंकाळी विविध प्रायोजकांचा सत्कार व आभार, नंतर श्रीकृष्ण देशमुख यांचे प्रवचन होणार आहे.

Web Title: Vaastu Shanti of Ram Mandir in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.