अपंगत्वावर विजय, कोल्हापुरी जिद्द, सार्वजनिक व्यासपीठावर सेकंड इनिंग्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:22 PM2017-12-04T14:22:53+5:302017-12-04T14:28:45+5:30
जिद्द, निर्धार आणि निष्ठेच्या बळावर कोल्हापुरातील एका तरुणाने संगीताच्या क्षेत्रात आपले स्वत:चे विश्व निर्माण केले. अपंगत्वावर मात करीत त्यांनी स्वत:मधील न्यूनत्व बाजूला सारले. कोल्हापुरी जिद्द दाखवित त्यांनी स्वत:च्या पायावर उभारण्यात यश मिळविले आहे. विजय पाठक हे त्या गायकाचे नाव.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जिद्द, निर्धार आणि निष्ठेच्या बळावर कोल्हापुरातील एका तरुणाने संगीताच्या क्षेत्रात आपले स्वत:चे विश्व निर्माण केले. अपंगत्वावर मात करीत त्यांनी स्वत:मधील न्यूनत्व बाजूला सारले. कोल्हापुरी जिद्द दाखवित त्यांनी स्वत:च्या पायावर उभारण्यात यश मिळविले आहे. विजय पाठक हे त्या गायकाचे नाव.
संगीतविश्वात दृढ निर्धाराच्या बळावर आपल्या कलेला पुनर्जन्म देणारे विजय पाठक हे गझल सम्राट. गाणं म्हणजे त्यांच्यासाठी जणू श्वासच; परंतु स्वरतंतूच्या दुखापतीने त्यांना ग्रासले. पाच वर्षांपूर्वी गाताना घशावर ताण येत होता; परंतु लक्षणं बळावल्यानं आणि तपासण्या केल्यानंतर स्वरतंतूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले.
व्होकल सिस्ट हे एखाद्या गायकासाठी भयंकरच. विजय यांच्या सिंगर्स नोड्यूलच्या निदानानंतर डॉक्टरांनी गाणं बंद करण्याचा सल्ला दिला. अॅलोपथीमध्ये शस्त्रक्रिया सुचवली. जर गाठ काढली, पण स्वरतंतू निकामी झाले तर काय, या विचाराने त्यांनी आयुर्वेदिक औषधांचा वापर सुरू केला.
या दरम्यान वैद्यकीय सल्ला धुडकावून गाणं सुरूच ठेवलं. त्यांच्या गायनाचे भक्तही ग्रेट होते. ते त्यांच्या कातर आवाजातही गाणे ऐकायला तयार असत. त्यामुळे खासगी मैफली अखंड सुरू राहिल्या. विजय यांच्यासाठी हे ऊर्जादायी ठरले. त्यांचे वारणा वाद्यवृंदाकडील कामही निरंतरच सुरू राहिले व आजही आहे.
अशी झाली शस्त्रक्रिया
डॉ. गोगटे यांच्यासोबत एक दिवस ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतरही गाता यायची शक्यता असल्याचे सांगितले. गाठीची बायोप्सी करायला हवी हे त्यांना पटवलं गेलं. मग ४ डिसेंबर २०१४ या दिवशी शस्त्रक्रिया करण्याची तारीख पक्की झाली. तरीही ३ डिसेंबरला घाटगे सरकारांसाठी खासगी मैफील करून दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेसाठी पुण्यात हजर झाले. लेसर किरणांनी ती गाठ कापून त्यांच्या स्वरतंतूंची सुटका करण्यात आली.
आठव्या दिवशी फॉलोअपवेळी डॉक्टरांनी आता गळ्याला अजिबात ताण द्यायचा नाही, असं सांगितल्यावर ते थिजलेच, पण मग कोल्हापुरी जिद्द दाखवत रियाज सुरू केले. सगळे व्याप सांभाळून रोज सात-आठ तास रियाज सुरू केला. पुन्हा खासगी मैफलींना बहर येऊ लागला. शस्त्रक्रियेला तीन वर्षे उलटल्यानंतर विजय यांनी पुन्हा गाण्याचे कार्यक्रम केले. परिश्रमपूर्वक हरवलेला सूर परत मिळवला !
सेकंड इनिंग्ज ४ डिसेंबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात
पण आता जिद्दीने आपल्यातील अपंगत्वावर मात करीत विजय यांनी सेकंड इनिंग्ज सुरू करण्याची तयारी केली आहे. बालाजी गार्डनमध्ये निवडक मित्रांसमोर नव्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर केला. विजय यांचं पुनरागमन आणि त्यासाठी स्वत: विकसित करून वापरलेली अफलातून संकल्पना यामुळे उपस्थित अवाक् झाले. दोन तास त्यांनी मन:पूत गायन केले. साथीला केदार गुळवणी व्हायोलिनवर, तर संजय साळोखे ड्रमवर. इतर सारी साथ वारणा वाद्यवृंदाच्या विद्यार्थ्यांची ! आता सेकंड इनिंग्जचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होत आहे.