हिंसक आंदोलन केल्यास गय नाही
By admin | Published: February 1, 2015 12:56 AM2015-02-01T00:56:34+5:302015-02-01T00:56:34+5:30
चंद्रकांत पाटील : साखर सहसंचालकांना दिला धीर
कोल्हापूर : सनदशीर मार्गाने आंदोलन करायला ना नाही; परंतु हिंसक आंदोलन करून सरकारी मालमत्तेचे नुकसान व अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे खपवून घेणार नाही. यापुढे असे प्रकार झाल्यास पोलीस अधीक्षक थेट गुन्हे दाखल करतील; तेव्हा आपल्याला कोणी गुन्हे दाखल करू नका, असा फोन करू नका. सर्व संघटना व राजकीय पक्षांबरोबरच भाजपच्या कार्यकर्त्यांचीही गय करणार नाही, असा इशारा आज, शनिवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
ऊसदरप्रश्नी काल, शुक्रवारी शिवसेनेने लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयात उग्र आंदोलन करून साखर सहसंचालकांना खुर्चीवर बाहेर हाकलले होते. या आंदोलनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खचल्याने त्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री पाटील यांनी या कार्यालयास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना धीर दिला.
सरकार तुमच्या पाठीशी आहे. जिल्हाधिकारी राजाराम माने व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना या ठिकाणी एकत्रितपणे बोलावून घेऊन आपल्याला धीर द्यायला आलो आहे. इथून पुढे यासंदर्भात प्रशासनाची भूमिका कडक राहील. आपल्या कार्यालयात नेहमी पोलीस बंदोबस्त राहील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी वारंवार असे प्रकार घडत आहेत; त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे त्यांनी सांगितले. यावर आंदोलकांनी भेटायला येताना पाच किंवा दहाच लोक त्यांच्या शिष्टमंडळातून येतील, अशा धोरणाची इथून पुढे अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. काल ज्या पद्धतीने आंदोलन झाले ते आम्ही इथून पुढे खपवून घेणार नाही. सनदशीर मार्गाने आंदोलनाला आमचा विरोध नाही; परंतु त्यासाठी असे प्रकार करणे योग्य नाही. जाळपोळ करणे, नाके फोडणे यांतून होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे आपल्याला झेपणार नाही, याचे भानही आंदोलकांनी ठेवावे असेही मंत्र्यांनी बजावले.
यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे, उपसंचालक डी.टी.भापकर, अधीक्षक रमेश भराडे, सर्व विशेष लेखापरीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर, विभागीय सहनिबंधक कार्यालयाचे उपनिबंधक डॉ. महेश कदम, शहर उपनिबंधक रंजन लाखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काळ्या फिती लावून काम
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला आंदोलनकर्त्यांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. त्याच्या निषेधार्थ आज, शनिवारी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. आगामी काळात असे प्रकार घडले तर थेट सामूहिक रजेवर जाण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
संघटनेकडून निषेध
यावेळी सहकारी विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कालच्या घटनेचा निषेध करून आज, शनिवारी काळ्या फिती बांधून काम केले. कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकारी संघटनेने याला पाठिंबा दिला.
वैयक्तिक आंदोलने
आंदोलन वैयक्तिक पातळीवर यायला लागली आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर याचा परिणाम होत आहे. कार्यालयातील जागा अपुरी असल्याने पर्यायी जागेचा शोध सुरू करा, अशा सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.