आवाजाची ओळख, बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा-आज समारोप : निनाद काळे यांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:38 AM2018-05-08T00:38:57+5:302018-05-08T00:38:57+5:30
कोल्हापूर : आवाजाची ओळख करून देण्यासह बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात सुरू आहे.
कोल्हापूर : आवाजाची ओळख करून देण्यासह बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात सुरू आहे. आवाज अभिनेता निनाद काळे मार्गदर्शनाखालील या कार्यशाळेत दहा ते सत्तर वर्षांपर्यंतचे आबालवृद्ध आवाजाबाबतचे धडे गिरवित आहेत. या कार्यशाळेचा समारोप आज, मंगळवारी सायंकाळी सात वाजता ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
याबाबत निनाद काळे यांनी सांगितले, मोबाईल क्रांतीमुळे माणसे ‘लँडलाईन’ आणि दूरध्वनी ‘मोबाईल’ झाले. आज एकमेकांशी बोलायचे तर टॉकटाईम रिचार्ज करावा लागतो. अशा पद्धतीने आपले बोलणे महाग होत आहे. अर्थात, आधीच्या काळात सगळचे आलबेल होते असे नाही, तर मोठ्यांनी सांगितलेले लहानांनी ऐकायचे हीच परंपरा होती. त्यामुळे आपल्याकडे कुटुंबात, शाळा-कॉलेज, धर्मात बोलण्याचा संस्कारच केला जात नाही. त्यामुळे पालक आपल्या मुलांशी, शिक्षक-प्राध्यापक विद्यार्थ्यांशी, एकूणच समाजात जसे बोलायला हवे तसे बोलले जात नाही. त्यामुळे आज प्रत्येक नातेसंबंधात तणाव वाढत आहे. मुलांचे बालपण हरवत आहे. त्यासह अभिनय, सूत्रसंचालन, डबिंग, गायन, शिक्षक, प्राध्यापक, वकील, मार्केटिंग, आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी बोलण्याचा पाया भक्कम असावा लागतो, पण याकडे आजतागायत कुणी फारसे गंभीर नाही. त्यामुळे मी आणि संगीता राठोड यांनी संबंधित गरज ओळखून वय वर्षे दहा ते सत्तर अशा सर्वांसाठी ही आवाजाची कार्यशाळा सुरू केली. दर महिन्याला दोन अशा पद्धतीने या कार्यशाळेचे राज्यभर आयोजन केले जाते.
आवाजासह विचारांची कार्यशाळा
चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेतील या कार्यशाळेत आवाजाची ओळख, श्वासाचे, जिभेचे अनेक व्यायाम प्रकार, आवाजाचे चढ-उतार, शब्दोच्चार यावर भर देत बोलताना उभे कसे राहायचे, हातवारे कसे करायचे, देहबोली कशी असावी. एखादा विषय समजून घेऊन मगच स्वयंस्फूर्तीने कसे बोलायचे, याचे मार्गदर्शन संपूर्ण प्रात्यक्षिक पद्धतीने केले जाते. ज्यामुळे कार्यशाळेतील प्रत्येक व्यक्तीला सर्वांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास केवळ पाच ते सहा दिवसांत येतो. आधी स्वत:शी मग इतरांशी बोलण्याचे भान येते. आवाजासह ही विचारांची कार्यशाळा असल्याचे निनाद काळे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहातील ‘आवाजाची कार्यशाळा’मध्ये निनाद काळे यांनी मार्गदर्शन केले.