जिल्हाधिकारी कार्यालयाला जेव्हा उशिरा जाग येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:58 AM2017-09-03T00:58:35+5:302017-09-03T00:59:53+5:30
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाड येथील सावित्री पूल कोसळून दुर्घटना घडून वर्ष उलटले आणि त्या पार्श्वभूमीवर आता पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल राष्टÑीय महामार्ग कार्यालयाला द्यावा, अशा आदेशाचे पत्र काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविले आहे. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाला तब्बल वर्षानंतर जाग आल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी इतक्या उशिरा का माहिती मागविली? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गतवर्षी आॅगस्टमध्ये घडलेल्या महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामध्ये कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा समावेश होता. त्याच्या शेजारीच पर्यायी शिवाजी पुलाचे काम निम्म्यावर येऊन केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानगीत अडकले होते.
हा पर्यायी पूल लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी कोल्हापूरकरांची भावना होती आणि ती आताही आहे. त्यानुसार ४ आॅगस्ट २०१६ ला तत्कालीन महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, आदींसह पदाधिकाºयांनी शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. यामध्ये ब्रिटिशकालीन पूल मुसळधार पावसाने वाहून जाऊन जीवितहानी झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करावा. त्याचबरोबर जुन्या शिवाजी पुलाची तांत्रिक पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतूक सुरू ठेवावी किंवा नाही याबाबत संबंधित यंत्रणेकडून सखोल पाहणी करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.
या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालयाला २९ आॅगस्ट २०१७ म्हणजे तब्बल वर्षानंतर जाग आली. त्यांच्याकडून ताराबाई पार्क येथील राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून याबाबत सविस्तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर केलेल्या कार्यवाहीची माहिती राष्टÑीय महामार्ग कार्यालयाला पाठवावी, असेही म्हटले आहे.
मुळात ही दुर्घटना घडून वर्ष झाले. त्यानंतर कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाबाबत इतका काथ्थाकूट झाला की, हा प्रश्न थेट संसदेत गेला. खासदार संभाजीराजे व खासदार धनंजय महाडिक यांनी हा प्रश्न उचलून धरत पर्यायी शिवाजी पुलाचे काम सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान, राष्टÑीय महामार्ग विभागाच्या कार्यालयीनस्तरावरही केंद्रीय कार्यालयाकडे पाठपुरावाही सुरू होता, असे असताना महापालिकेच्यावतीने गतवर्षी दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालय एवढ्या उशिरा का जागे झाले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या निमित्ताने या कार्यालयातील भोंगळ आणि अजब कारभाराचा नमुना समोर आल्याचे दिसत आहे.
इतक्या उशिरा का? हा आम्हालाही प्रश्न
ही दुर्घटना घडून एक वर्ष झाले. त्यानंतर कोल्हापुरातील पुलासंदर्भात राष्टÑीय महामार्ग कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा करून योग्य ती माहिती संबंधित यंत्रणेला पाठविण्यात आली आहे; परंतु याबाबत महापालिकेने वर्षभरापूर्वी दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालयाने आताच का पत्र दिले? हा आम्हालाही प्रश्न पडल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.