कोल्हापूर-सांगली कोंडी कधी सुटणार? : पाच वर्षांपासून महामार्गाचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:16 AM2018-03-07T00:16:56+5:302018-03-07T00:16:56+5:30
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गाची कोंडी कधी सुटणार? हा प्रश्न तब्बल पाच वर्षांनंतरही कायम आहे. या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला असला तरी अद्यापही सांगली-कोल्हापूर महामार्ग सुप्रीम कंपनीच्या अखत्यारित आहे.
संदीप बावचे ।
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गाची कोंडी कधी सुटणार? हा प्रश्न तब्बल पाच वर्षांनंतरही कायम आहे. या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला असला तरी अद्यापही सांगली-कोल्हापूर महामार्ग सुप्रीम कंपनीच्या अखत्यारित आहे. त्यामुळे या महामार्गावरील समस्यांची मालिका कायम असून, बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच या महामार्गाचे घोंगडे भिजत पडले आहे.
२०११ मध्ये सांगली-कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाची निविदा निघाली होती. मुंबईतील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम मिळाले होते. प्रत्यक्षात २०१२ मध्ये या कामाला सुरुवात झाली. रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनी व भूसंपादन याचा अडथळा रस्त्याच्या कामात आला, तर काही ठिकाणचे भूसंपादनच झाले नाही.
अशा अनेक समस्यांच्या फेऱ्यात सुप्रीम कंपनीने रस्त्याचे काम सुरू केले. एकीकडे अपघातांची मालिका, तर दुसरीकडे रस्त्याचे अपुरे काम अशा परिस्थितीत चार वर्षे पूर्ण झाले तरीही रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. एप्रिल २०१६ मध्ये सुप्रीम कंपनीला शासनाने काळ्या यादीत टाकले. यावेळी ९५ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा कंपनीने केल्यानंतर टोल वसुलीच्या हालचाली सुरूझाल्या. शिरोली, उदगाव, अंकली येथे टोलनाके बसविण्यासाठी शेड उभारण्यात आले; मात्र अद्याप रस्ता पूर्ण नाही. झालेली कामे निकृष्ट आहेत.
त्यातच टोल वसुलीचा घाट सांगली, अंकली, उदगाव, शिरोळ, जयसिंगपूर व इचलकरंजीकरांना प्रत्यक्ष चौपदरीकरणाचा लाभच मिळणार नाही. त्यामुळे टोलचे भूत आमच्या मानगुटीवर का! असा पवित्रा घेत टोलविरोधी कृती समितीने लढ्याला प्रारंभ केला. नागरिकांचा विरोध झाल्यानंतर टोलवसुली नाक्याचे कामच थांबले. सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामांचे मूल्यांकन पूर्ण झाले. त्यानंतर कंपनीला कामाच्या किमतीबाबत किती कोटी द्यायचे याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली. सध्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे महामार्ग पूर्णत्वाचा प्रश्न पुन्हा अधांतरी पडला आहे.
अपघातांची मालिका सुरूच
1 हातकणंगले येथे रखडलेल्या उड्डाणपुलाबरोबरच तमदलगे खिंड ते अंकली बायपास रस्ता व तमदलगे ते जयसिंगपूर या दुपदरी रस्त्याचे कामही अपूर्णच आहे. या दोन्ही मार्गावर अडचणीची समस्या आजही कायम आहे.
2 अद्याप हा मार्ग सुप्रीम कंपनीच्या अखत्यारितच असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातून सांगण्यात येते. या मार्गावर अपघातांची मालिका कायम असून, चौपदरीकरणांतर्गत दुपदरी रस्ते पूर्ण झाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते.
पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेत
सांगली-कोल्हापूर महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रखडलेल्या कामाबाबत निविदा काढून रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले होते. गेल्या पाच वर्षांपासून महामार्गावरील समस्यांची कोंडी तर कायमच आहे. त्यातच पालकमंत्र्यांनी अपुºया रस्त्याबाबत दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्ग अजूनही सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्याच ताब्यात आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरूआहे. बांधकाम विभागाकडे हा महामार्ग हस्तांतरित नसल्यामुळे निधी खर्च करता येत नाही.
- व्ही. शिंदे, उपअभियंता, जयसिंगपूर.