थोडा तरी शाहू विचार जगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:13 AM2018-06-27T06:13:32+5:302018-06-27T06:13:35+5:30
केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ भावे यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
गर्दीने खचाखच भरलेल्या शाहू स्मारक सभागृहात हा शानदार समारंभ पार पडला. प्रा. भावे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वांनीच उठून उभे राहून भावे यांच्या कार्याला टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली. ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विश्वस्त प्रा. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेताना पुष्पा भावे म्हणाल्या, सध्या देशभरात घोषित आणीबाणी नसली तरी ती असल्यासारखीच परिस्थिती आहे. मोठ्या पेचप्रसंगातून आपण चाललो आहोत. एका राजकीय गटाच्या ठिकाणी दुसरा गट सत्तेवर आला, एवढ्यापुरते हे मर्यादित नाही; परंतु वंचितांचा, सर्वसामान्यांचा विचार कोण करणार आणि सर्वांसाठी नेतृत्व म्हणून कुणाकडे पाहायचे, हा खरा प्रश्न आहे. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांची जी मूल्याधिष्ठित दृष्टी होती, ती अंगी बाणवून आपल्याला यापुढील काळात काम करावे लागेल. त्यांच्या मूल्यदृष्टीकडे अविवेकाने पाहिल्यानेच ही वेळ आली आहे.