झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीद्वारे कोट्यवधींचा गंडा; तीन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:10 AM2018-05-02T05:10:11+5:302018-05-02T05:10:11+5:30
झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो
कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्टÑासह कर्नाटकातील चारशेपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली.
संशयित राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४१), त्याचा भाऊ अनिल (४६, दोघे, रा. हुपरी, ता. हातकणंगले), संजय तमन्ना कुंभार (४२, रा. शिरढोण, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यातील मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. आतापर्यंतच्या चौकशीमध्ये फसवणुकीची रक्कम २५ कोटींपेक्षा जास्त असल्याचे पुढे आले आहे.
नेर्लेकर, कुंभार, गणगे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये भागीदारीमध्ये ‘झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सी’ ही डिजीटल कंपनी काढली. तिचे कार्यालय लक्ष्मीपुरी कोंडा ओळ (कोल्हापूर) येथे सुरू केले. या कंपनीची आॅनलाईन जाहिरात मोठ्या प्रमाणात करून गुंतवणूकदारांना महिन्याला पंधरा टक्के लाभांश बीट क्वॉईनच्या रूपात देतो, असे आमिष दाखवून दहा हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत महाराष्टÑासह कर्नाटकातील गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले.
गुंतवणूकदारांचे आॅनलाईन वॉलेट तयार करून त्याद्वारे बाळासाहेब लक्ष्मण झालटे (४०, रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) व त्यांच्या मित्रांकडून २९ लाख ५० हजार रुपये गुंतवणुकीसाठी घेतले. गेल्या सात महिन्यांत ४०० पेक्षा जास्त जणांकडून अशाप्रकारे कोट्यवधी रुपये उकळले. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी कंपनीच बंद केली. आॅनलाईन व्यवहारही बंद झाल्याने गुंतवणूकदार हादरून गेले. त्यांनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते टाळाटाळ करू लागले.
आपण गुंतविलेल्या पैशांचा संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचे समजताच झालटे यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली.त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार दिली. सुमारे ७० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलीस मुख्यालयात गर्दी केली होती.
घरासह कार्यालयाची झडती
संशयित नेर्लेकर यांच्या हुपरी येथील घराची आणि कुंभार याच्या कोंडा ओळ चौकातील कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली. घरातील बँक खात्यांची पासबुके, काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली. कार्यालयातील संगणक, त्याचा डाटा, स्कॅनर, प्रिंटर जप्त करून कर्मचाºयांचे जबाब घेतले.