लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 07:11 PM2018-07-04T19:11:08+5:302018-07-04T20:45:28+5:30
मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली.
लातूर : मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांवर वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत़
जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे़ पटसंख्या २२० आहे़ नेहमीप्रमाणे आज दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली़ ती खाल्ल्यानंतर काही वेळांनी १४१ विद्यार्थ्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे असा त्रास होऊ लागला़ काही विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षकांना दिली तर काहींनी घरी जाऊन पालकांना दिली़ त्यामुळे गावचे सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी तात्काळ या विद्यार्थ्यांना उपचारासाठी वाढवणा (बु़) (ता़ उदगीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे़ उर्वरित १३१ विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़
१० जणांची प्रकृती गंभीर
जुलाब, उलटी, पोटदुखी असा त्रास होणारे मंगरुळ येथील १४१ विद्यार्थी दाखल झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे़ खिचडीतील आळ्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता आहे़ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, असे वाढवणा बु़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ वर्षा कानवटे व डॉ़ जी़पी़ भारती यांनी सांगितले
खिचडीत आळ्या असल्याचा आरोप
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीत आळ्या होत्या़ त्यामुळेच विद्यार्थ्यांना हा त्रास झाला़ या घटनेची चौकशी करुन स्वयंपाकी, मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी केली आहे़