वेटरचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:24 PM2018-09-13T17:24:02+5:302018-09-13T17:24:59+5:30
एका ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरचा दोन वर्षांपूर्वी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.
लातूर : औसा तालुक्यातील लोदगा येथील एका ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरचा दोन वर्षांपूर्वी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याबाबत आरोपी विकास दिलीप शिंदे याला लातूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
७ सप्टेंबर २०१६ रोजी लोदगा येथील एका ढाब्यावर काम करणाऱ्या एका वेटरचा दगडाने ठेचलेला मृतदेह गवतात टाकल्याचे आढळून आले होते. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाला गती दिली. त्यानंतर हा मृतदेह बापू बळीराम मसे यांचा असल्याचे पुढे आले. बापू मसे याच्यासोबत याच ढाब्यावर काम करणाऱ्या विकास दिलीप शिंदे (रा.राक्षसवाडी, ता.कर्जत, ह.मु. लोदगा) याच्याशी वाद झाला होता. मयत बापू मसे याने विकास शिंदे याच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर चिडलेल्या विकासने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचून मारले व मृतदेह नजीकच्या रस्त्यालगत शेतात फेकून दिला.
या खटल्यात लातूरच्या न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. न्यायालयात १० जणांची साक्ष झाली. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. जोशी यांनी आरोपी विकास शिंदे याला पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. संतोष देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना दिलीप नागराळे, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार आर.के. राठोड यांनी सहकार्य केले.