Jail Bharo for Maratha Reservation : लातूरमध्ये संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 01:29 PM2018-08-01T13:29:08+5:302018-08-01T13:32:54+5:30
मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
लातूर : मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. परिणामी, जिल्हा पोलीस दलाच्यावतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन होऊ नये यासाठी हे घर संभाजीराव पाटील-निलंगेकर यांचे नसल्याचे स्पष्ट करत, हे घर त्यांच्या भावाचे आहे असे सांगितले. यावर आंदोलकांनी मग 'पालकमंत्री लातुरात आल्यावर भाड्याने राहतात काय?' असा सवाल उपस्थित केला. आंदोलकांनी यावेळी संभाजीराव पाटील - निलंगेकर यांच्यासह इतर मंत्री आणि पंतप्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. घरासमोर आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड लावत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
आजपासून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी पालकमंत्री निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.