Maharashtra Election 2019 : लातुरात बंडोबा मैदानात; लढणार की नमणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:23 PM2019-10-05T14:23:23+5:302019-10-05T14:24:42+5:30
काय घडते अन् काय बिघडते, याकडे सर्वांचेच लक्ष
लातूर : लातूर ग्रामीण, उदगीर, औसा, अहमदपूर या चारही मतदारसंघांत अखेर बंडोबा मैदानात आले असून, अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत नेमके काय घडते अन् काय बिघडते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ दरम्यान, बंडोबा शेवटपर्यंत लढणार की, पक्षापुढे नमणार, हेही दोन दिवसांत कळणार आहे़
शेवटच्या दिवशी उदगीरमधून भाजपचे आ़ सुधाकर भालेराव यांनी कवड्याच्या माळा परिधान करून अपक्ष उमेदवारी दाखल केली़ त्यामुळे उदगीरमधील सामना चुरशीचा होणार आहे़ सलग दोन वेळा भाजपा तिकिटावर निवडून आलेले अपक्ष उमेदवार सुधाकर भालेराव, भाजप उमेदवार डॉ़ अनिल कांबळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्यात तिरंगी लढत होईल़
लातूर ग्रामीण मतदारसंघातही काँग्रेसचे धीरज देशमुख, शिवसेनेचे सचिन रामराजे देशमुख आणि अपक्ष उमेदवार रमेश कराड अशी तिरंगी लढत अटळ आहे़ कराड यांनी दोन वेळा भाजपाकडून निवडणूक लढविलेली होती़ आता अचानकपणे मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे़
औशात बंडखोरी
औसा विधानसभा मतदारसंघही भाजपला सुटल्याने तेथे शिवसेनेचे माजी आ़ दिनकर माने, औशाचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़