Maratha Reservation: आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या, ह्रदय पिळवटून टाकणारे शेवटचं पत्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 04:13 PM2018-08-08T16:13:45+5:302018-08-08T16:30:53+5:30
मुलाला शिक्षण देऊनही त्यास नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. आता...
लातूर : मुलाला शिक्षण देऊनही त्यास नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. त्यामुळे निराश झालेल्या लातूर जिल्ह्यातील माटेफळ येथील एका शिक्षकाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रमेश पाटील असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट ह्रदय पिळवून टाकणारी आहे.
लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षक रमेश ज्ञानोबा पाटील हे निवळी येथील एका संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. एक मुलगी एमएसस्सी तर दुसऱ्या मुलीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मुलगाही पदवीधर असून, तो सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. त्यांना दहा एकर शेती असून त्यावर राष्ट्रीयकृत बँक आणि सहाकारी बँकेचे 3 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज आहे. कर्जाची परतफेड होत नाही. आरक्षण नसल्याने मुलांनाही नोकरी मिळत नसल्याचे कारण मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाटील यांनी नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून, याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नैराश्यातून आत्महत्या
मुलाला चांगले शिक्षण दिले. शिक्षणावर मोठा खर्च करुनही नोकरी मिळत नाही. तसेच मराठा आरक्षणबद्दल सरकार चालढकल करत असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. यातूनच त्यांच्यात नैराश्य आले होते. मुलाचे काय होणार? ही चिंता त्यांना सतावत होती. हा ताण सहन न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
पत्नीला पेन्शन मंजूर करावी
कुठलीही संधी न मिळाल्याने उच्चशिक्षित मुले घरीच आहेत. माझ्या पगारावर घरप्रपंचही चालत नाही. त्यामुळे खासगी कर्ज काढण्याची वेळ माझ्यावर आली आणि त्यातून मी कर्जबाजारी झालो. माझ्या पश्चात प्रपंचासाठी पत्नीला लवकर पेन्शन मंजूर करावी असेही रमेश पाटील यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.