'आम्ही मागितले टँकर, चारा, छावण्या; सरकारने दिल्या लावण्या अन् डान्स बार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 05:22 PM2019-02-24T17:22:59+5:302019-02-24T17:23:35+5:30
शेतक-यांना घोषित केलेली कर्जमाफी पूर्णपणे दिलेली नाही. राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. अशावेळी आम्ही पाण्याचे टँकर, चारा छावण्या मागितल्या तर सरकारने लोकांना डान्स बार अन् लावण्या दिल्या.
लातूर : शेतक-यांना घोषित केलेली कर्जमाफी पूर्णपणे दिलेली नाही. राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. अशावेळी आम्ही पाण्याचे टँकर, चारा छावण्या मागितल्या तर सरकारने लोकांना डान्स बार अन् लावण्या दिल्या. हे सत्ताधारी मन की नव्हे तर मतलब की बात करतात, असा संताप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी रविवारी लातुरात व्यक्त केला.
लातूर येथील मांजरा कारखाना परिसरात स्व. विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डा. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, आ.मधुकरराव चव्हाण, माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील, आ.अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, उल्हास पवार, धीरज देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले, आम्ही कामं केलीत. जुमलेबाजी केली नाही. आता निवडणुका आल्यात. सत्ताधारी आश्वासनांचा पाऊस पाडतील. मात्र, मिळणार काहीच नाही. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाच आहे. धनगर-मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत बोलाचाच भात बोलाचीच कढी शिजविली जातेय. यावेळी मते द्या, मग पुढच्या सत्ताकाळात आरक्षण देऊ, असे भाजपावाले सांगत आहेत. या फसवणुकीपासून आता सावध झाले पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. आघाडीबाबत बोलताना त्यांनी आता जागावाटपाची बोलणी सुरु झाल्याचे सांगितले. मतविभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीस सोबत येण्याची विनंती केली. चार जागांची ऑफर दिली आहे. शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा असल्याचेही चव्हाण म्हणाले.