आई-वडिलांच्या सततच्या प्रश्नांना कंटाळून 17 वर्षांच्या मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 05:14 PM2017-06-13T17:14:49+5:302017-06-13T17:14:49+5:30
जुनी पिढी आणि नवीन पिढीतील अंतर कधीकधी जिवावर बेतलं जाते. पालकांचा निगेटिव्ह संवाद हा मुलांमध्ये दुरावा निर्माण करतो.
ऑनालइन लोकमत
नागपूर, दि. 13- जुनी पिढी आणि नवीन पिढीतील अंतर कधीकधी जिवावर बेतलं जाते. पालकांचा निगेटिव्ह संवाद हा मुलांमध्ये दुरावा निर्माण करतो. याचाच प्रत्यय नागपूरमध्ये आला आहे. आई-वडिलांच्या सततच्या प्रश्नाला कंटाळून 17 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वारंवार फोनवर कोणाशी बोलते, शॉर्ट कपडे का घालते, गॅलरीत का उभी राहते? या आई-वडिलांच्या प्रश्नाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली.
कोमल संजय सराटे (वय 17, रा. अभ्यंकरनगर) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. माहितीनुसार, संजय सराटे हे प्रॉपर्टी डीलर असून त्यांना कोमल आणि चैताली दोन मुली आहेत. कोमल ही बारावीत, तर चैताली दहावीत आहे. कोमल घरात मोठी असल्याने तिच्यावर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी पालकांची धडपड सुरू होती. तिचे वाकडे पाऊल पडू नये म्हणून तिच्या वागण्यावर पालकांचा वॉच होता. मात्र, तिला पालकांची बंधने झुगारून जगायला आवडत होते. सांगितलेले ऐकत नसल्यामुळे किंवा योग्य वागत नसल्यामुळे पालक तिच्यावर ओरडत होते. कोमलने या सर्व त्रासाला कंटाळून घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी कोमलचा मोबाईल फोन जप्त केला आहे.