राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:11 PM2020-02-21T12:11:29+5:302020-02-21T12:13:19+5:30
ऊस नसल्याचे कारण; राज्यात ४५६ लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन
सोलापूर : यंदा ऊस गाळप हंगामावर कमालीचा परिणाम होईल असे दिसत असून सुरू झालेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली वगळता अन्य जिल्ह्यातील गाळप हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात आटोपला जाईल असे सांगण्यात आले.
मागील वर्षी राज्यात पाण्याची मोठी तीव्रता होती. जानेवारीपासून १० आॅगस्टपर्यंतचा कालावधी हा कडक उन्हाचा होता. यामुळे उसासह सर्वच पिके करपली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्र उन्हाच्या तडाख्यातून वाचले होते; मात्र पुरामुळे नुकसान झाले होते. सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा पट्टा वगळता अन्य ठिकाणचा ऊस जळाला होता. यामुळे यावर्षी अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला नाही.
कोल्हापूर, पुणे व सोलापूर विभागातील ९० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता व त्यापैकी तीन कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागातील तीन व औरंगाबाद विभागातील ७ कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम आटोपला आहे. म्हणजे गाळप हंगाम सुरू केलेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरला सुरू झालेले कारखाने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बंद होण्यास सुरुवात झाली असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात बºयापैकी हंगाम आटोपला जाईल असे सांगण्यात आले. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ४१८ लाख मे. टन ऊस गाळप केला असून ४५६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातच ५० लाखांपेक्षा अधिक गाळप कमी होणार आहे.
राज्यातील साखर हंगामावर एक नजर
- - कोल्हापूर जिल्हा ९५ लाख ५७ हजार मे. टन गाळप करुन प्रथम क्रमांकावर असून, पुणे जिल्हा ५८.८८ लाख मे.टन गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहे.
- - दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा ५२ लाख गाळप करुन तिसºया क्रमांकावर आहे. ऊस क्षेत्राची स्थिती पाहता सोलापूर जिल्हा गाळपात आणखीन मागे येईल असे सांगण्यात आले.
- - सातारा जिल्हा ४८ लाख ८१ हजार मे.टन, सांगली जिल्हा ४६.७१ लाख व अहमदनगर जिल्हा ४४.१५ लाख मे.टन गाळप झाले आहे.
- - मराठवाड्यातील केवळ जालना व बीड या दोन जिल्ह्यातील गाळप ८ लाखांपेक्षा अधिक झाले असून अन्य जिल्ह्याचे गाळप फारच कमी आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने व गाळप होणारा सोलापूर जिल्ह्यातील एक साखर कारखाना बंद झाला आहे. ऊस तोडणी यंत्रणा अपुरी असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. यामुळेच ऊस कमी असला तरी कारखाने सुरू आहेत. जवळपास सर्वच कारखाने १० मार्चपर्यंत बंद होतील.
- रविकांत पाटील