भेसळयुक्त पदार्थांचा ३० हजार किलोचा साठा जप्त , सप्टेंबर महिन्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:40 AM2017-10-14T04:40:18+5:302017-10-14T04:41:08+5:30

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे

 30,000 kg of adulterated substances seized, action taken in September | भेसळयुक्त पदार्थांचा ३० हजार किलोचा साठा जप्त , सप्टेंबर महिन्यातील कारवाई

भेसळयुक्त पदार्थांचा ३० हजार किलोचा साठा जप्त , सप्टेंबर महिन्यातील कारवाई

Next

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईसह राज्यभरातून अन्न व औषध प्रशासन विभागाने खवा, मावा, मिठाई, वनस्पती तेल-तूप अशा विविध भेसळ असलेल्या पदार्थांचा तब्बल ३० हजार ४४९ किलोचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून भेसळखोरांपासून सावध राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत, दिवाळीच्या फराळांची मनसोक्त लज्जत चाखली जाते. या कालावधीत फराळासाठी मावायुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने, याचा फायदा घेत विक्रेते भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडतात. राज्य व राज्याबाहेरून आणण्यात येणाºया मावायुक्त पदार्थांवर नजर ठेवण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबविली जाते. दिवाळीनिमित्त शहरात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांसाठी तूप, तेल, दुग्धपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी भेसळयुक्त माल बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मिठाई तयार करण्यासाठी खवा, तसेच वनस्पती तुपाची मागणी वाढली आहे.
दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर व दिवाळीच्या कालावधीत ही मोहीम राबविली जाते. सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ८२२ भेसळयुक्त पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.
एफडीएच्या विशेष भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाते. महत्त्वाची रेल्वे स्थानके व जेथे मालाची ने-आण केली जाते, अशा ठिकाणी विशेष नजर असते, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title:  30,000 kg of adulterated substances seized, action taken in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी