भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; चंद्रकांत पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 02:22 PM2017-08-31T14:22:49+5:302017-08-31T15:19:19+5:30
मुंबई, दि. 31- मुंबईतील जे जे मार्ग परिसरात सहा मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ढिगाऱ्याखाली 60 ते ...
मुंबई, दि. 31- मुंबईतील जे जे मार्ग परिसरात सहा मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ढिगाऱ्याखाली 60 ते 65 जण अडकल्याचा अंदाज मुंबई मनपाने वर्तविला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि फायर ब्रिगडेच्या जवानांना यश आले. या संपूर्ण अपघाताची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत म्हणून पाच लाख रूपयांची मदत केली जाणार आहे. यामध्ये तीन लाख रूपये मुख्यमंत्री निधीतून दिले जाणार आहेत तर दोन लाख रूपये मुख्यमंत्री विशेष निधीतून दिले जाणार आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसंच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा वैद्यकीय खर्च सरकार करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी होणार असून म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केली जाणार आहे आणि त्या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे.
या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये एकूण 9 कुटुंबे राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही इमारत १०० ते १२५ वर्षे जुनी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान कोसळेली इमारत सेस अंतर्गत येत असल्याची माहिती समोर आली आहे.
एक नजर टाकूया घटनाक्रमावर
भेंडी बाजार परिसरातील मौलाना शौकत अली रोडवरील बोरी मोहल्ला येथे 5 मजली हुसैनी नावाची इमारत कोसळली
सकाळी 8.30 वाजता : हुसैनी इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास प्राप्त
सकाळी 8.31 वाजता : अग्निशमन दलानं दुर्घटनेची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिली
सकाळी 8.31 वाजता : अग्निशमन दलानं गाड्या घटनास्थळी रवाना केल्याची वेळ
सकाळी 8.38 वाजता : अग्निशमन दलाच्या 3 गाड्या, 2 फायर इंजिन व 1 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचले
सकाली 8.38 वाजता : अग्निशमन दलाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार House Collapse Call Level 2 ची घर कोसळण्याची घटना असल्याचे घोषित करण्यात आले
सकाली 8.42 वाजता : अग्निशमन दलाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार House Collapse Call Level 3 ची घर कोसळण्याची घटना असल्याचे घोषित करण्यात आले
सकाली 8.45 वाजता : राष्ट्रईय आपत्ती प्रदिसादक पथकाला कार्यान्वित करण्यात आले
सकाली 9.45 वाजता : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे 90 जवानांचे पथक घटनास्थळी दाखल
हुसैनीवाला इमारत धोकादायक होती - पालकमंत्री सुभाष देसाई
दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सकाळी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. हुसैनीवाला ही इमारत धोकादायक होती. या प्रकरणाच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले जातील तर प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं सुभाष देसाई यांनी म्हंटलं आहे. दक्षिण मुंबईत बहुसंख्य इमारती धोकादायक आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता तातडीने सोडविला जाईल, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत. दुर्घटना झालेली इमारत ही धोकादायक असल्याने काही लोकांनी आधीच घरं रिकामी केली होती. पण काही कुटुंब इमारतीत राहत होते. तेच लोक अपघातात सापडल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला आहे
{{{{dailymotion_video_id####x845agx}}}}