कृषी पदवी प्रवेशासाठी ६२ हजार ऑनलाईन अर्ज !
By admin | Published: July 15, 2015 12:29 AM2015-07-15T00:29:55+5:302015-07-15T00:29:55+5:30
कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल.
अकोला : कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत यंदा ६१,९६९ विद्यार्थ्यांंनी ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे केले आहे. या अर्जांची छाननी सुरू असून, गुणवत्ता यादी कृषी विद्यापीठांत लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. रत्नागिरी या चार कृषी विद्यापीठांतर्गत राज्यात ३३ शासकीय व १४0 विनाअनुदानित कृषी महाविद्यालये आहेत. गतवर्षी कृषी, उद्यानविद्याशास्त्र, वनशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, गृह विज्ञान, मत्स्यशास्त्र ,जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कापणीपश्चात तंत्रज्ञान या विविध कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी १३ हजार २९७ जागांसाठी ५३ हजार ९३२ विद्यार्थ्यांंनी अर्ज केले होते. यंदा या अर्जात वाढ झाली असून, १३ हजार ९९७ जागांसाठी ६१ हजार ९६९ विद्यार्थ्यांंनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांंनी ३0 जूनपर्यंंत ऑनलाईन अर्ज दाखल केले असून, २२ जुलैपासून प्रवेश फेरीला सुरुवात होणार आहे. सुटीच्या दिवशीही प्रवेश फेर्या सुरू च राहणार आहे. प्रवेशासाठी यंदा विक्रमी अर्ज प्राप्त झाले असून, कृषी अभ्यासक्रमासह जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांंचा कल वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंचा कल वाढत असून, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या विविध शाखांमध्ये प्रवेश मिळावा, याकरिता यंदा अर्जांंची संख्या तिप्पट वाढली आहे; पण राज्यातील कृषी महाविद्यालयांची संख्या व उपलब्ध असलेल्या जागा याचा ताळमेळ बघूनच विद्यार्थ्यांंना प्रवेश दिला जाणार असल्याचे महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील संचालक डॉ. श्रीकांत काकडे यांनी सांगीतले.