तब्बल ६८ टक्के दूध भेसळीचे; कॅन्सरसारखा आजार दार ठोठावतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 04:18 PM2018-09-26T16:18:33+5:302018-09-26T16:19:03+5:30

दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

68 percent of milk adulteration; Cancer is knocking on the door | तब्बल ६८ टक्के दूध भेसळीचे; कॅन्सरसारखा आजार दार ठोठावतोय

तब्बल ६८ टक्के दूध भेसळीचे; कॅन्सरसारखा आजार दार ठोठावतोय

googlenewsNext

मुंबई : देशभरात तब्बल ६८ टक्के दुधात भेसळ होत असून दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वी या प्रश्नावर वारंवार आवाज उठविला आहे. सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही दुधात भेसळ होत असल्याचे स्पष्ट केले आहे.  या भेसळीमुळे २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय, कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना बळी पडतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यामुळे भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे.

राज्यात संघटीत व असंघटीत क्षेत्रात मिळून सरासरी प्रतिदिन २ कोटी ८० लाख लिटर दुधाचे वितरण होते. दुधाचे शेतकऱ्यांकडून होणारे संकलन मात्र यापेक्षा कमी आहे. परराज्यातून येणारे दूध जमेस धरले तरी उत्पादन व आवक यापेक्षा वितरण अधिक होत आहे. केमिकल वापरून तयार केलेल्या लाखो लिटर बोगस दुधाची भर पडल्यानेच उत्पादनापेक्षा वितरण अधिक होताना दिसते आहे. पाणी, पावडर, स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, अमोनियम, मीठ, न्युट्रीलायजर, हायड्रोजन पेरॉक्साईड, डीटर्जंट पावडर यासारख्या पदार्थांचा वापर करून लाखो लिटर भेसळीचे दूध राज्यात तयार होत आहे. कारवाई मध्ये पकडण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीमुळे या म्हणण्याला वारंवार दुजोरा मिळाला आहे. 


दूध उत्पादकांना यामुळेच त्यांच्या दुधाला अत्यल्प भाव मिळतो आहे. ग्राहकांनाही या भेसळीमुळे निकृष्ट व आरोग्यास अत्यंत घातक दूध विकत घ्यावे लागत आहे. दुधातील ही भेसळ रोखण्यासाठी भेसळ शोधणाऱ्या ‘मिल्क स्ट्रीप’चा  वापर मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. दुधाचे उत्पादन, आवक व वितरण याचा अचूक ताळमेळ लावणारी यंत्रणाही निर्माण करणे आवश्यक आहे.

अन्न व औषधी प्रशासन आणि नगर पालिकांकडे भेसळ शोधण्याची मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने भेसळ विरोधी पथके नसल्यात जमा आहेत. परिणामी भेसळीचा महापूर सुरु आहे. शेतकरी व ग्राहकांच्या आरोग्याशी सुरु असणारा हा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी सरकारने आता तरी गंभीर होत भेसळी विरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. 
 

Web Title: 68 percent of milk adulteration; Cancer is knocking on the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.