आरे प्रकरण;निरुपमांविरुद्ध २५ कोटींचा दावा, रवींद्र वायकर यांची उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:34 AM2017-11-17T02:34:39+5:302017-11-17T02:35:04+5:30
आरेतील २० एकर जमीन हडप करून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्या जागी व्यायामशाळा बांधल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरु पम यांनी केला होता.
मुंबई : आरेतील २० एकर जमीन हडप करून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्या जागी व्यायामशाळा बांधल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरु पम यांनी केला होता. याप्रकरणी लोकायुक्तांनी वायकर यांनी क्लीन चीट दिल्यानंतर आता त्यांनी निरु पम यांच्याविरुद्ध २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात केला आहे.
वायकर परदेशात असताना निरुपम यांनी पत्रकार परिषद बोलावून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तसेच लोकायुक्तांकडे याची तक्रारही केली होती. वायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले होते. तसेच निरुपम यांनी बदनामी केल्याबद्दल जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसान भरपाईचा दावा ठोकू, असेही बजावले होते.
मात्र या प्रकरणावर लोकायुक्तांकडे सुनावणी प्रलंबित असल्याने वायकरांनी त्यावेळी उच्च न्यायालायत दावा दाखल केला नाही. लोकायुक्तांनी म्हाडा, आरे प्रशासन व दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यावर वायकर यांना क्लीनचीट दिली.