अॅसिड हल्ला पीडितांना मिळणार १० लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:41 AM2017-07-19T01:41:29+5:302017-07-19T01:41:29+5:30
बलात्कार, अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांचे पुनर्वसन व त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठीच्या मनोधैर्य
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बलात्कार, अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांचे पुनर्वसन व त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठीच्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता या योजनेत कमाल ३ लाख रुपयांऐवजी १० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला.
अॅसिड हल्ल्यामुळे महिला किंवा बालकास मतिमंदत्व, अपंगत्व आल्यास, सामूहिक बलात्कारांच्या प्रकरणात गंभीर इजा झाल्यास किंवा अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यास १० लाखांचे अर्थसहाय्य मिळेल. ७५ टक्के रक्कम १० वषार्साठी पीडितांच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून तर २५ टक्के रकमेचा धनादेश तात्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३१ डिसेंबर २००९ पासूनच्या पात्र प्रकरणांना पूर्वलक्षी प्रभावाने ही योजना लागू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्रात बळी पडलेल्या व्यक्तींकरीता गृह विभागाची नुकसान भरपाई योजना २०१४ व महिला व बाल विकास विभागाची मनोधैर्य योजना यामध्ये समन्वय ठेऊन एकाच पीडितास दोन्ही योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
सध्याच्या निकषानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा क्षति सहाय्य व पुनर्वसन मंडळास अर्थसहाय्य मंजूर करण्याचे अधिकार आहेत. आता हे अधिकार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आले आहेत.