राज्यातही आता कृषिमूल्य आयोग
By admin | Published: April 24, 2015 02:10 AM2015-04-24T02:10:51+5:302015-04-24T02:10:51+5:30
शेतीमालास किफायतशीर भाव मिळावेत व ग्राहकांना वाजवी दरात शेतीमाल खरेदी करता यावा याकरिता शेतमाल भाव समितीचे पुनर्गठन करून केंद्र सरकार धर्तीवर राज्यातही ‘कृषिमूल्य आयोग’ स्थापन करण्यात आला आहे.
मुंबई : शेतीमालास किफायतशीर भाव मिळावेत व ग्राहकांना वाजवी दरात शेतीमाल खरेदी करता यावा याकरिता शेतमाल भाव समितीचे पुनर्गठन करून केंद्र सरकार धर्तीवर राज्यातही ‘कृषिमूल्य आयोग’ स्थापन करण्यात आला आहे. केंद्र सरकारने वेगवेगळ्या पिकांकरिता जाहीर केलेल्या आधारभूत किमती जर राज्य शासनाने शिफारस केलेल्या किमतीपेक्षा कमी असतील, तर राज्य शासनाने केलेल्या शिफारशीनुसार फरकाची रक्कम देण्यात यावी की कसे, याबाबत हा आयोग राज्य सरकारला शिफारस करणार आहे.
कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली जाणार असून, त्यावर विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी खात्याचे अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्त, विविध विद्यापीठांमधील कृषी अर्थशास्त्र विभागांचे विभागप्रमुख, निमंत्रित शेतकरी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि राज्य कृषिमूल्य आयोगाचे सहसंचालक अशा १४ जणांचा समावेश असेल. (विशेष प्रतिनिधी)