उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे ध्येय
By admin | Published: July 19, 2015 03:09 AM2015-07-19T03:09:03+5:302015-07-19T03:09:03+5:30
राज्यपाल विद्यासागर राव यांच्याशी ‘कॉफी टेबल’ या ‘लोकमत’च्या विशेष उपक्रमांतर्गत झालेल्या चर्चेचा हा गोषवारा
तिन्ही बाजूने विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेली प्रशस्त वास्तू, घोंघावणारा वारा आणि ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अनेक चिजा-वस्तू असलेले ठिकाण म्हणजे राजभवन. महामहीम राज्यपाल विद्यासागर राव यांच्याशी या वास्तूत ‘लोकमत’च्या संपादकीय चमूने विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. राज्यपाल राव यांनीदेखील शिक्षणासह पर्यटन, दुष्काळी परिस्थिती, आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचा प्रश्न, शिवस्मारक आदी विषयांवर मते व्यक्त केली. राज्यपाल विद्यासागर राव यांच्याशी ‘कॉफी टेबल’ या ‘लोकमत’च्या विशेष उपक्रमांतर्गत झालेल्या चर्चेचा हा गोषवारा...
महाराष्ट्रातील शिक्षणाकडे तुम्ही कसे पाहता?
- राज्यातील शिक्षण उत्तमच आहे. यात अजून सुधारणा करण्यासाठी विशेष योजना आखण्याचे नियोजन केलेले आहे. उच्च शिक्षणाचा प्रमुख या नात्याने पदवी शिक्षण कसे दर्जेदार होईल, यासाठी ठोस कार्यक्रम आखण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने शिक्षण कसे असावे, याचा आदर्श ठेवला आहे. आयआयटीसोबत सामंजस्यातून त्यांनी संशोधनातही मोठी प्रगती साधली आहे. आता राज्यातील ५० महाविद्यालयांची निवड आम्ही करणार आहोत. या महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्याचे प्रयत्न गांभीर्यपूर्वक केले जाणार आहेत. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणे या महाविद्यालयांमध्येही उपक्रम राबवले जातील, जेणेकरून येत्या काही वर्षांत उत्तम अभियंते तयार होतील. जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील, असे अभियंते निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
आदिवासी विकासासाठी तुम्ही स्वत: पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल काय सांगाल?
- यवतमाळ, नांदेड व नंदुरबार जिल्हे आम्ही दत्तक घेतले आहेत. मला महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे कौतुक करावेसे वाटते. त्यांनी अत्यंत मेहनतीने या भागातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. केंद्र सरकार आदिवासी विकासासाठी मोठा निधी देत असते. अन्य राज्यात हा निधी वेगळ्या कामासाठी वळवला जातो. पण महाराष्ट्रात तसे झालेले नाही. राज्यात हा निधी अजून शाबूत आहे. यातील पाच टक्के निधी आम्ही थेट ग्रामपंचायतींना विकासासाठी वितरीत केला आहे. आदिवासी भागांचादेखील प्रामुख्याने विकास केला जाणार आहे. आदिवासीच या निधीचा वापर कसा करायचा ते ठरवतील. रस्ते, पाणी किंवा अन्य पायाभूत सुविधांसाठी याचा वापर करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला जाईल. आदिवासी विभागातील कुपोषण रोखण्यासाठीही हा निधी वापरला जाणार आहे. हा निधी देताना कोणीही मध्यस्ती नसेल. पंचायत कायद्यानुसार ग्रामपंचायतींना हा निधी मिळणार आहे. आदिवासी मुलांना शिक्षण व नोकऱ्यांसाठी तरतूद करून त्यांची त्यांच्याच भागात नियुक्ती करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. कारण आदिवासी अधिकारीच त्यांच्या भागातील समस्या अधिक प्रभावीपणे सोडवू शकतात.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कशी मात करता येईल ?
- ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळे दुष्काळाचे सर्वत्र सावट आहे. पण यावर तोडगा म्हणजे सिंचन प्रकल्पांची प्रभावीपणे आखणी करून ते राबवणे. मराठवाडा व विदर्भात सिंचन प्रकल्प प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे. यासाठी विद्यमान सरकार काम करतेच आहे. तरीही नियोजनबद्ध कार्यक्रमाद्वारेच या समस्येवर मात करता येणे शक्य आहे.
पर्यटन या संकल्पनेवरही आपला नेहमी जोर असतो, या संदर्भात काय सांगाल?
- कास्टिझम, कम्युनिझम अथवा अन्य कोणत्याही इझमपेक्षा टुरिझम जगासाठी महत्त्वाचा आहे. बहुतांश देश स्वत:कडील पर्यटनाचे चांगले मार्केटिंग करीत आहेत. महाराष्ट्रातील पर्यटनही जागतिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवणे गरजेचे आहे. राज्याचे पर्यटन देशात अग्रस्थानी आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परदेशी चलन येण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तेव्हा राज्यातील पर्यटनस्थळांचे अधिकाधिक मार्केटिंग करून जगाचे लक्ष महाराष्ट्राकडे वळवणे गरजेचे आहे. राज्याच्या पर्यटनाचा विचार करताना ऐतिहासिक अशा किल्ल्यांचाही प्रामुख्याने विचार व्हायला हवा. रायगडसारखा किल्ला संपूर्ण जगाचे आकर्षण ठरू शकतो. सध्या रायगडावर रोप वे आहे; पण स्वयंचलित ट्रेनच्या माध्यमातून काही मिनिटांत संपूर्ण किल्ल्याला फेरी मारणे शक्य आहे. अशा योजना येथे राबवायला हव्यात. अनेक किल्ल्यांचा पर्यटनासाठी उत्तम उपयोग होऊ शकतो.
ऐतिहासिक स्मारक आणि इतिहासाचे जतन किती महत्त्वाचे आपण मानता ?
- अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात गैर काहीच नाही. पण त्यासोबतच इतिहासाचे जतन करणेही अत्यावश्यक आहे. ‘मी शिवाजी महाराज भोसले बोलतोय’ हा चित्रपट मी आवर्जून बघितला. शिवाजी महाराजांचे शौर्यच सदैव स्फूर्ती देणारे आहे. त्यामुळे त्याची आठवण ठेवणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. नाहीतर चित्रपटाप्रमाणे शिवाजी महाराजांना पुन्हा प्रत्यक्षात येऊन इतिहासाची आठवण करून देण्याची वेळ येईल. जर इतिहास जपला नाही, तर तो पुढील पिढीपर्यंत पोहोचणार नाही. इतिहासातून पुढच्या पिढ्यांना स्फूर्ती मिळत असते.
ज्येष्ठ पत्रकार शोएबुल्ला खान यांच्या गौरवासाठी आग्रह का? आपण त्यांचे स्मारक उभारण्यासाठीही मोठे योगदान दिले आहे.
- होय, हैदराबादला आम्ही त्यांचे स्मारक उभारले आहे. जातीय सलोखा जपण्यासाठी आजवर देशात दोन पत्रकारांनी जीवाची आहुती दिली. ज्येष्ठ पत्रकार शोएबुल्ला खान यांनी जातीय सलोख्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी एका मासिकात लिहिलेल्या लेखाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा जीव गेला. अशा देशप्रेमी पत्रकाराचा गौरव होणे आवश्यक आहे. खान हे हैदराबादचे असल्याने त्यांचा गौरव करण्याचा पहिला ठराव मी मांडला. खान यांच्यासोबतच उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांनीही जातीय सलोख्यासाठी अत्यंत प्रशंसनीय असे कार्य केले आहे. त्यांचीही हत्या करण्यात आली. विद्यार्थी व खान हे देशातील दोन असे दिग्गज पत्रकार आहेत, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती जातीय सलोख्यासाठी दिली. दुर्दैवाने ही माहिती अनेक पत्रकारांना नाही. म्हणून अशाच नि:पक्षपाती पत्रकारांचा गौरव झालाच पाहिजे.
१७ सप्टेंबरचा उल्लेख आपण अनेकदा करता, या दिवसाचे काय महत्त्व आहे?
- देशभर १५ आॅगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिन साजरा झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण मुक्ती संग्रामामुळे औरंगाबादपासून ते नांदेडपर्यंत तिरंगा फडकू शकला नाही. या भागात तिरंगा फडकला तो १७ सप्टेंबर १९४८ रोजी. ही बाब अजूनही अनेकांना माहीत नाही. ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला होणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही जाणीवपूर्णक प्रयत्न करणार आहोत. कारण इतिहासाची इत्थंभूत माहिती येणाऱ्या प्रत्येक पिढीला द्यायला हवी.
प्रशस्त राजभवनबद्दल आपल्याला काय वाटते ?
- कोलकाता, चेन्नई, हैदराबाद येथेही प्रशस्त राजभवन आहेत. मुंबईतील राजभवनला निसर्गसौंदर्याची मोठी देणगी लाभलेली आहे. राष्ट्रपती भवनपाठोपाठ आलिशान असे हे एकमेव राजभवन आहे. मुळात येथील अधिकारी व कर्मचारी अत्यंत कर्तव्यनिष्ठ आहेत. त्यांच्यामुळेच या प्रशस्त वास्तूची निगा राखली गेली आहे. ते राजभवनची काळजी तत्परतेने घेत असतात. त्यांची शिस्तदेखील कौतुकास्पद आहे. निसर्गाच्या सान्निध्यामुळे हे राजभवन भेट देणाऱ्या प्रत्येकाला मोहात पाडणारे आहे.
तुम्ही सर्वप्रथम राजभवनात आलात, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ?
- मी पहिल्यांदा राजभवनात आलो, तेव्हा येथील मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने मी खूपच अचंबित झालो. एवढ्या वाहतूक कोंडीतून येथील नागरिक कसा मार्ग काढतात, हा प्रश्न मला पडला होता. राजभवनात पोहोचेपर्यंत राजभवन एवढ्या गर्दीच्या ठिकाणी कसे काय असेल, असा प्रश्न मला पडला होता. पण राजभवनात प्रवेश केला आणि या वास्तूमुळे मन प्रसन्न झाले.
निवांत वेळ मिळतो तेव्हा आपण काय करता ?
- कामाचा व्याप एवढा आहे, की निवांत वेळ फारच कमी असतो. त्यातही वेळ मिळालाच तर वाचन करायला आवडते. मी आणीबाणीच्या वेळी कारागृहात होतो. तेथे मी बरेच लिखाणही केले होते. अजूनही लेखन होत असते. काही लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्धही झाले होते. अलीकडेच अशा लेखांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते झाले. लिखाणातून विचार मांडण्याची संधी मी घेत असतो.