सक्तीच्या खात्याबद्दल एअरटेल बँकेची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:40 AM2017-08-03T03:40:39+5:302017-08-03T03:40:41+5:30
एअरटेलचा मोबाइल क्रमांक ‘आधार’शी लिंक करताच न मागता बचत खाते गळ््यात मारल्याबद्दल एअरटेल पेमेंट बँकेने गोपाळ महादेव जोग या मुंबईतील ग्राहकाची माफी मागितली
विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : एअरटेलचा मोबाइल क्रमांक ‘आधार’शी लिंक करताच न मागता बचत खाते गळ््यात मारल्याबद्दल एअरटेल पेमेंट बँकेने गोपाळ महादेव जोग या मुंबईतील ग्राहकाची माफी मागितली असून हे खाते बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. या संबंधीचे वृत्त बुधवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच एअरटेल पेमेंट बँकेच्या दिल्ली येथील मुख्यालयातून एका वरिष्ठ अधिकाºयाने जोग यांना फोन केला व झाला प्रकार चुकीने झाल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न करतानाच दिलगिरी व्यक्त केली.
जो प्रकार घडला तो गंभीर आहे व तो घडायला नको होता. गॅलरीतील ज्या कर्मचाºयाच्या चुकीमुळे ही चूक घडली त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे या अधिकाºयाने जोग यांना सांगितले. नको असताना उघडलेले बचत खाते आधी बंद करा व तसे मला कळवा. मगच माझे समाधान होईल, असा आग्रह जोग यांनी धरला. त्यावर या अधिकाºयाने खाते कसे बंद करता येईल हे पाहतो आणि ते बंद करतो, असेही जोग यांना सागितले.
त्या खात्यात जमा झालेले गॅस सबसिडीचे ६३ रुपये काढून शिल्लक शून्य होत नाही तोपर्यंत खाते बंद करता येत नाही, अशी अडचण आहे. जोग यांनी मात्र हे पैसे काढून घेण्याचा व्यवहार करण्यास नकार दिला आहे.