Kedgoan double murder : हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र, अजित पवार यांनी केला संग्राम जगताप यांचा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 10:47 AM2018-04-09T10:47:07+5:302018-04-09T10:47:33+5:30
केडगाव येथे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय जगत हादरले आहे. आता या हत्याकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली असून...
मुंबई - केडगाव येथे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय जगत हादरले आहे. आता या हत्याकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले असून, शिवसेनेने या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेसवर सनसनाटी आरोप केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली असून, संग्राम जगताप यांचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नसून, त्यांना या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा केला आहे. तसेच हे राष्ट्रवादी कांग्रेसच्या बदनामीचे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, "संग्राम जगताप यांचा या हत्येशी काहीही संबंध नाही. या प्रकरणात संग्राम जगताप यांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. तसेच या प्रकरणातील खरे आरोपी पोलिसांनी शोधून काढावेत,'' असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
शनिवारी (7 एप्रिल) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील सुवर्णनगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर वार करून त्यांना ठार मारले होते.
यापूर्वी या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. तर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 22 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
कोणाकोणाचा आहे समावेश?
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर यांच्या सांगण्यावरुन विशाल कोतकर, औदूंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, रवी खोलम, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिर्हे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गंगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे यांच्यासह पाच ते सहा जणांनी कट, कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता तलवारीने मारल्याचे या फिर्यादीत म्हटले गेले आहे.