अंदमान हे राष्ट्रप्रेमाचे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे

By admin | Published: September 6, 2015 04:59 AM2015-09-06T04:59:44+5:302015-09-06T04:59:44+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साहित्य, राजकारणात गाठलेली उंची आपण गाठू शकणार नाही. मात्र, आजच्या राजकारणी व साहित्यिकांनी अशी उंची गाठण्याचा निदान प्रयत्न तरी करावा

Andaman should be a pilgrimage center for patriotism | अंदमान हे राष्ट्रप्रेमाचे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे

अंदमान हे राष्ट्रप्रेमाचे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे

Next

अंदमान : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साहित्य, राजकारणात गाठलेली उंची आपण गाठू शकणार नाही. मात्र, आजच्या राजकारणी व साहित्यिकांनी अशी उंची गाठण्याचा निदान प्रयत्न तरी करावा, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केली. अंदमान हे राष्ट्रप्रेमाचे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे. येथे जगभरातील पर्यटकांना खुणावेल असे स्मारक उभारण्यात येत असेल तर सेनेचे त्याला पूर्ण समर्थन असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आदी उपस्थित होते.
सावरकर हे साहित्यिक आणि राजकारणीदेखील होते. या दोहोंमध्ये त्यांनी मोठी उंची गाठली. याचा आपण मानसन्मान राखला पाहिजे. त्या उंचीचे साहित्य निर्माण होण्याबरोबरच तसेच राजकारणही व्हायला हवे, असे सांगून ठाकरे म्हणाले, सावरकरांच्या काव्यपंक्ती काढण्याचा नतद्रष्टपणा काँग्रेस सरकारने केला. इतिहासाकडे बघा म्हणणारे अशा वेळी इतिहासाकडे डोळेझाक करतात.
डॉ. शेषराव मोरे म्हणाले, सावरकरांवरील अभ्यासामुळे मला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. अंदमान हे एकेकाळी भयंकर शिक्षेचे नाव होते. आता ते स्वातंत्र्याचे प्रतिक बनले आहे. मात्र, भारतातीलच काही दुष्ट बुद्धीचे आणि कृतघ्न लोक ओरडतात की सावरकरांनी येथून सुटण्यासाठी ब्रिटिशांकडे दयेचा अर्ज का केला? दोन जन्मठेपांची नरकमययात्रा भोगणाऱ्यांनाच हा अधिकार आहे, अशा नतदृष्टांना नाही.
महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आज दिल्लीवर प्रभाव राहिला नाही, तसाच साहित्यिकांचाही नाही. बुध्दीमता, संशोधकता आणि प्रतिभा असूनही इंग्रजी भाषेच्या ज्ञानात मराठी साहित्यिक कमी पडतात. इतर भाषेतील साहित्यिक इंग्रजीत लिहितात किंवा मातृभाषेतील लिखाणाचा स्वत:च अनुवाद करतात, असे सांगून ते म्हणाले, मराठीला ज्ञानपीठ मिळण्यास उशीर झाला याचे कारणही इंग्रजीचे ज्ञान नाही, हेच आहे. ज्याची इंग्रजी उत्तम होती, त्याला ते लवकर मिळाले, हे देखील आपण पाहिले आहे.
अखिल भारतीय स्पर्धेत उतरायचे असेल तर मराठी लेखकाने इंग्रजीतही पारंगत होणे आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे, असा नाही. पाचवी ते दहावीपर्यंत एक इंग्रजी विषय घेतला तरी त्यात पारंगत होता येते. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्र शासनही इंग्रजी शाळांना उत्तेजन द्यायचे व मराठी शाळांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबत असल्याचे त्यांनी नमूद केले. संमेलनाला खासदार संजय राऊत, रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.
साहित्यिकांविनाच साहित्यसंमेलन
चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी साहित्यिकांविनाच सुरुवात झाली. साहित्यिकांऐवजी राजकीय विशेषत: शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. ग्रंथदिंडीने या संमेलनाला प्रारंभ झाला. सेल्युलर जेल येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी पावणेआठ वाजता ग्रंथदिंडी निघाली. शेषराव मोरे, सदानंद मोरे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह साहित्य रसिक व सावरकरप्रेमी दिंडीत सहभागी झाले. मात्र, दिंडीत स्थानिकांना मानाचे स्थान देण्यात आले नाही. डॉ सदानंद मोरे वगळता कोणत्याही मुख्य साहित्यिकाचा दिंडीत समावेश नव्हता. गर्जा जयजयकार, गर्जा महाराष्ट्र माझा, जयोस्तुते.. यासह विविध गीते, कविता, एकनाथी भारुड म्हणत पारंपरिक वेशभूषा नि टाळ-मृदंगाच्या गजरात रसिकांनी अंदमाननगरी दुमदुमुन सोडली.
ग्रंथदिंडीचा समारोप महाराष्ट्र मंडळ येथे स्वागताधक्ष व खासदार राहुल शेवाळे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत झाला.

पुरोगामी दहशतवादाचे मराठी वैचारिकतेसमोर आव्हान
‘हिंदू’ या शब्दाचा वापर करून आपण प्रतिगामी वा जातीयवादी तर ठरणार नाही ना, या भीतीखाली आजची मराठी वैचारिकता आहे. हिंदूंच्या विरोधात जेवढे अधिक बोलू तेवढे आपण पुरोगामी ठरू. हे पुरोगामी दहशतवादाचे आव्हान मराठी वैचारिकतेसमोर आहे, असे प्रा. सदानंद मोरे यांनी सांगितले. आज खरेखुरे पुरोगामी त्यामुळे या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. या पुरोगाम्यांनीच सावरकारांसारख्या विज्ञाननिष्ठाला ते केवळ हिंदूत्ववादी असल्याने प्रतिगामी ठरविले.

Web Title: Andaman should be a pilgrimage center for patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.