न्यायालयात रागावर नियंत्रण न ठेवणे पडू शकते ‘महागात’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:32 AM2019-10-18T11:32:19+5:302019-10-18T11:37:11+5:30
अशील नव्हे तर वकिलांना जेव्हा येतो राग : दरवेळी कसं होईल मनासारखं?
युगंधर ताजणे-
पुणे : अयोध्येत राममंदिराची उभारणी करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाने न्यायाधीशांसमोरच काही कागदपत्रे फाडल्याची घटना घडली. संबंधित वकिलाला राग अनावर झाल्यानंतर त्या रागाच्या भरात न्यायालयाचा अवमान झाला. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढील काळात न्यायालयात असे प्रकार होणार नाही याची काळजी वकिलांनी घेणे गरजेचे आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा न्यायालयात अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या वकील आणि अशील, वकील आणि न्यायाधीश यांच्यातील शाब्दिक चकमकीच्या प्रसंगांना उजाळा देण्यात आला आहे. त्यात अशीलच नव्हे तर त्या अशिलाची उलटतपासणी घेणारे वकील, बचाव पक्षाचे वकील व न्यायाधीशांमधील ‘खटक्याच्या’ आठवणी काही वकिलांकडून घेतल्या आहेत.
.......
शेवटी आरोपीच्या वकिलांनी मागितली माफी
प्रथम वर्ग न्यायालयातील दोन वर्षांपूर्वीची घटना होती. यात आरोपीच्या वकिलांनी सुनावणीकरिता पुढील तारखेची मागणी न्यायधीशांकडे केली. न्यायधीशांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याचवेळी दुसºया वकिलांनी खटल्यासंदर्भात दुसरी तारीख द्यावी, अशी मागणी न्यायाधीशांकडे केली. एकाच खटल्याच्या सुनावणीसाठी दोन वेगवेगळ्या तारखा देणे न्यायाधीशांना शक्य नव्हते. त्यांनी याकरिता मध्यममार्ग काढून त्या दोन्ही वकिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचे वकील काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचे दुसऱ्या वकिलासोबत भांडण सुरू झाले. ते मोठ्याने आरडाओरड करत होते. नंतर हे प्रकरण मिटले. काही वेळाने आरोपीच्या वकिलांना आपली चूक समजली. त्यांनी येऊन न्यायाधीशांची माफी मागितली.
.......
मग तुम्ही काय कारवाई करणार ?
साधारण सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आरोपीला नियोजित तारखेला न्यायालयात हजर करणे बंधनकारक असताना कारागृह पोलिसांकडून संबंधित आरोपीला हजर करण्यात येत नव्हते. ज्यावेळी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्याने न्यायाधीशांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. ‘तुमचा आदेश असताना पोलीस दिलेल्या तारखेवर हजर करत नाही, अशी तक्रार आरोपीने न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने त्याला कारागृह पोलिसांच्या विरोधात अर्ज लिहून देण्यास सांगितले. त्यानंतर
त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. आरोपीने ‘साहेब ते पोलीस अधिकारी आपल्या आदेशाचे योग्य रीतीने पालन करीत नाहीत तर त्यावर तुम्ही काय कारवाई करणार?’असा प्रतिप्रश्न न्यायालयाला केला. त्यावेळी उपस्थित सर्व वकील, नागरिक आणि पोलीस अधिकारी आरोपीकडे पाहत आश्चर्यचकित झाले होते.
........
तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देतो...
एक ज्येष्ठ वकील अशिलाची उलटतपासणी घेत होते. अशील चतुर होता. मोठ्या सावधपूर्वक तो उत्तरे देत होता. काही प्रश्नांची उत्तरे तो जाणीवपूर्वक टाळायचा. ही गोष्ट न्यायधीशांच्या देखील लक्षात आली होती. यावर त्यांनी आरोपीला सूचना देखील दिल्या होत्या. मात्र ज्येष्ठ वकिलांच्या रागाचा पारा चढला होता. त्यांनी अशिलाला योग्य रीतीने उत्तरे देण्यास सांगितले. आरोपीने पुन्हा त्याकडे दुर्लक्ष क रून आपला हेका कायम ठेवला. त्यानंतर ज्येष्ठ वकिलांना राग अनावर झाला. त्यांनी परखड शब्दांत आरोपीची कानउघाडणी केली. ‘एकदा का तुम्ही साक्ष देऊन बाहेर पडलात की मग तुम्हाला तुमच्या भाषेत योग्य पद्धतीने समजावून सांगतो.’ असे त्या वकिलांनी न्यायधीशासमोर आरोपीला सुनावल्यानंतर आरोपीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
...........
न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली पुस्तके
कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित एका खटल्याची सुनावणी सुरू होती. साधारण तीन वर्षांपूर्वीचा हा खटला होता. यात बचाव पक्षाचे वकील मोठे नावाजलेले वकील होते. त्यांचे कायदाक्षेत्रात नाव होते. त्यांनी माझ्या एका युक्तिवादावर हरकत घेतली. मात्र ती हरकत का घेतली याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडे मागितले असता त्यांना ते देता आले नाही. त्यांच्यासमवेत असणारे इतर ज्युनिअर वकील यांच्यासमोर झालेल्या अपमानामुळे त्यांना आणखीनच राग आला. तो त्या वकिलांना इतका अनावर झाला, की त्यांनी त्या रागाच्या भरात न्यायाधीशांच्या टेबलाच्या दिशेने पुस्तके व फाईली भिरकावल्या. योगायोगाने संबंधित प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीशांचाही न्यायालयातील तो पहिलाच दिवस होता. हा प्रकार पाहून ते पुरते भांबावून गेले होते. - एक महिला वकील
.........
आजीबाई न्यायाधीशांना उलट उत्तर देतात तेव्हा...
नवºयाच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना होती. फिर्यादी आत्महत्या केलेल्या महिलेची आई होती. त्या ७० वर्षांच्या होत्या. फिर्यादीची उलट तपासणी घेत असताना आजीबाई प्रश्नांना सरळ उत्तरे देत नसल्याचे दिसून आल्या. याबद्दल त्यांना सांगण्यात आल्यानंतर देखील त्यांची उत्तर देण्याची पद्धत तशीच होती. या खटल्याचे कामकाज एका महिला न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सुरू होते. त्या न्यायधीशांनी आजीबार्इंना त्यांच्या उत्तरे देण्याच्या पद्धतीवरून हटकले. ‘प्रश्न विचारणे वकिलांचे कामच असते. ते त्यांना करुन द्यावे. तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे ठाऊक आहेत त्याची उत्तरे द्या. यावर आजीबार्इंनी ‘वकिलांचे काय काम असते व न्यायाधीशांचे देखील काय काम असते? हे मला माहिती आहे.’’ यावर न्यायाधीश त्या आजीबाईकडे पाहतच राहिल्या. - अॅड. मिलिंद पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन