संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 09:06 PM2019-11-11T21:06:24+5:302019-11-11T21:16:51+5:30
लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आले आहेत. त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी सुरू आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस संजय राऊत राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजपावर सतत टीकेचे बाण मारणाऱ्या संजय राऊत यांना आज दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखू लागल्यानं राऊत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले. पुढील दोन दिवस ते रुग्णालयात असतील.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत होते. कामाचा व्याप वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास होत होता. मात्र त्याकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. अखेर आज दुपारी कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर डॉ. जलील पारकर यांची टीम उपचार करत आहेत.
रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यातून त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज असल्याचं आढळून आलं. त्यानंतर आता त्यांच्यावर अँजिओप्लास्टी सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागेल. राऊत यांच्या वेळापत्रकात गेल्या काही दिवसांपासून बदल झाला होता. याशिवाय त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला होता. त्यांच्यावर पक्षाकडून विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. या जबाबदाऱ्या आता खासदार अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.