अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- सव्वादोन महिन्यांनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 01:15 PM2018-01-11T13:15:07+5:302018-01-11T14:01:27+5:30
पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह तब्बल सव्वादोन महिन्यानंतर गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सांगली : पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह तब्बल सव्वादोन महिन्यानंतर गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अमरधाम स्मशान भूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी मृतदेहाची मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल दोन महिने तपासणी सुरु राहिल्याने मृतदेह ताब्यात देण्यास विलंब लागला.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी लुटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले व कामटेचा नातेवाईक बाबासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी ७ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह जाळला होता. ८ नोव्हेंबर सांगली पोलिसांच्या पथकाने आंबोलीत घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. सिंधुदुर्गचे जिल्हा न्यायाधीश व तहसील यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. विच्छेदन तपासणीसाठी मृतदेह मिरज शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. मृतदेह जळाला असल्याने विच्छेदन तपासणीला वेळ लागला. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांकडून तब्बल दोन महिने तपासणी सुरु होती. तपासणीची ही प्रक्रिया दोन दिवसापूर्वी पूर्ण झाली. त्यानंतर सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक मुकूंद कुलकर्णी यांनी कोथळे कुटुंबाशी संपर्क साधून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली होती.
नातेवाईकांनी दि. ११ जानेवारीला (गुरुवार) मृतदेह ताब्यात घेतो, असे सांगितले. तत्पूर्वी सीआयडीने अनिकेतचा मृतदेह पेट्यामधून सीआयडी कार्यालयात आणून ठेवला होता. दुपारी पावणेबारा वाजता मृत अनिकेतचा भाऊ आशीष व अमित कोथळे व अन्य नातेवाईक सीआयडी कार्यालयात आले. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर साडेबारा वाजता मृतदेह ठेवलेल्या पेट्या कोथळे कुटूंबाच्यात ताब्यात देण्यात आल्या. महापालिकेच्या शववाहिकेतून मृतदेह घरी नेण्यात आला. अनिकेतची आई व पत्नी संध्या यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दहा-पंधरा मिनीटानंतर मृतदेह अमरधाम स्मशान भूमित नेण्यात आला. तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले.