गाजावाजा न करता उभारतेय लाखभर वस्तिमित्रांचे ‘अनुलोम’
By यदू जोशी | Published: January 4, 2018 04:44 AM2018-01-04T04:44:56+5:302018-01-04T05:52:34+5:30
कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून
मुंबई - कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून, लवकरच ते लाखाचा टप्पा गाठणार आहे.
‘अनुलोम’ म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान. रयतेच्या राज्याची संकल्पना खºया अर्थाने सिद्ध व्हावी, यासाठी सरकारच्या प्रयत्नांना समर्थ साथ देण्याच्या उद्देशाने ‘अनुलोम’ची संकल्पना साकार झाली आहे. हे सरकार आपले आहे, अशी भावना सामान्यांच्या मनात निर्माण करण्याचा उद्देशही आहेच.
बड्या कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज हाती असताना ते क्षणात बाजूला सारून, ‘अनुलोम’ची उभारणी केली, ती उच्चशिक्षित असलेले अतुल वझे यांनी. ते ‘अनुलोम’चे सीईओ आहेत. ते, पंकज पाठक, स्वानंद ओक अशांनी एकत्रित येऊन गेल्या दोन वर्षांत हे जाळे विणले. प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक, प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक आणि सहा लोकसभा मतदार संघ मिळून एक अशा ३५४ जनसेवकांची भक्कम फळी तयार करण्यात आली. प्रत्येक जनसेवकाने दररोज किमान १० जणांना अभियानात जोडले. त्यातून हजारो कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने सोबत आले. अनुलोममधील वस्तिमित्र कुठल्याही मानधनाशिवाय कामे करतात. जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाची तजवीज सीएसआर फंडातून केली जाते. शासकीय योजनांबाबत जनसेवक आणि वस्तिमित्रांना अद्ययावत माहिती असावी, म्हणून त्यांना दर ३ महिन्यांनी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विविध विभागांच्या शासकीय अधिकाºयांची मदत घेतली जाते.
अतुल वझे आणि त्यांच्या सहकाºयांनी मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून, काही महिन्यांपूर्वी ‘अनुलोम’च्या संकल्पनेचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छांचे भक्कम पाठबळ आज ‘अनुलोम’च्या मागे आहे.
५ हजार तलावांतील गाळ नेणार शेतांमध्ये
तलावांची साठवण क्षमता वाढेल आणि शेतीही सुपीक होईल, या उद्देशाने राज्यातील हजारो पाझर तलावांमधील गाळ काढून, तो शेतामध्ये नेण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. ‘अनुलोम’मधील वस्तिमित्र आता येत्या फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत तब्बल ५ हजार तलावांमधील गाळ काढून शेतीवर नेण्यासाठी खपणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग घेतला जाईल.
काटेकोर आचारसंहिता
समाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी धडपड करणाºया वस्तिमित्रांसाठी एक आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. ती म्हणजे, कुठेही शासकीय यंत्रणेवर दादागिरी करायची नाही. ‘माहिती नाही का, मी वस्तिमित्र आहे म्हणून!’असा अहम् भाव येऊ द्यायचा नाही. यंत्रणेशी सहकार्य करून साध्य गाठायचे. आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाते.