अश्विनी बिंद्रे-गोरे खून प्रकरण : मृतदेहासाठी वसई खाडीत शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:01 AM2018-03-06T06:01:12+5:302018-03-06T06:01:12+5:30
निर्घृण हत्या झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंदे्र-गोरे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी तपास पथकाने सोमवारी वसई खाडीत नऊ पाणबुड्यांनी साडेतीन तास शोधमोहीम राबविली.
मीरा रोड - निर्घृण हत्या झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंदे्र-गोरे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी तपास पथकाने सोमवारी वसई खाडीत नऊ पाणबुड्यांनी साडेतीन तास शोधमोहीम राबविली. परंतु गाळ व गढूळ पाण्यामुळे त्यांना काही सापडले नाही. त्यामुळे मंगळवारीही शोधमोहीम सुरुच राहणार आहे.
अश्विनी बिंद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याने भार्इंदरच्या गोडदेव येथील मुकुंद प्लाझामधील राहत्या घरी अश्विनी यांची हत्या केली. तसेच लाकूड कापण्याच्या कटर मशीनने मृतदेहाचे तुकडे करुन मित्र महेश पळणीकरसह वरसावे पुलावरुन वसई खाडीत टाकल्याचे तपासात उघड झाले आहे.
त्याअनुषंगाने वरसावे भागात वसई खाडीत आरोपी पळणीकर याने ज्या जागा दाखवल्या तेथे शोधमोहीम घेण्यात आली. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, सहाय्यक आयुक्त नीलेश राऊत, संगीता अल्फान्सो, अश्विनी यांचे पती राजू गोरे यांच्यासह नौदलाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यासाठी तीन स्पीड बोटी तैनात होत्या. या मोहीमेत पाण्याखालच्या कॅमेरांचा वापर करण्यात आला. खोल पाण्यात तसेच तळाशी शोध घेण्यात आला. परंतु आतील पाणी खुपच गढूळ होते. तसेच खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौदलाच्या पाणबुड्यांच्या हाती काही लागले नाही.
दरम्यान, अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी सोमवारीही पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्यावर ते सुरवातीपासूनच आरोपी कुरुंदकर याला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. तसेच खाडीत अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी पाण्याखाली चांगल्या पध्दतीने शोध घेणा-या यंत्रणांचा वापर करण्याची गरज व्यक्त केली.
कुंदन भंडारीला न्यायालयीन कोठडी
कळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला वाहनचालक कुंदन भंडारी यास सोमवार, १९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचबरोबर तपासातील गतीबाबत पोलिसांना विचारणा करण्यात आली. पळणीकरची कबुली वगळता बाकी पुरावे पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाही.
अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाचा छडा दोन वर्षे लागला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला पाठपुरावा व उच्च न्यायालयाचा आदेश यामुळे तपासाची चक्रे हलली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. तसेच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील सुध्दा अटकेत आहे.
मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची हत्या केली व इतर तिघांच्या मदतीने वसई खाडीत मृतदेहाची विल्हेवाट लावली असा भांडाफोड महेश पळणीकरने केला. न्यायालयाच्या परवानगीने २७ फेब्रुवारीला कुरुंदकर याची पोलिसांनी ११ ते ४ या दरम्यान चौकशी केल्याचे समजते.
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा - मुख्यमंत्र्यांना निवेदन
याप्रकरणी ज्येष्ठ सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना कोल्हापूरच्या प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सोमवारी दिले.