सॅनिटरी नॅपकिनसाठी अस्मिता योजना
By Admin | Published: May 29, 2017 05:01 AM2017-05-29T05:01:48+5:302017-05-29T05:01:48+5:30
राज्यांतील किशोरवयीन मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिनचा वापर १७ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी व कायमस्वरूपी योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २८ राज्यांतील किशोरवयीन मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिनचा वापर १७ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी व कायमस्वरूपी योजना सुरू करण्यासाठी तसेच महिला बचतगटांना व्यवसायास वाव मिळवून शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या दरात देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात येत असल्याचे ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
महिला व बालविकास विभाग, ग्रामविकास विभाग व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन जनजागृती’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी मुंडे बोलत होत्या. या वेळी मुंडे म्हणाल्या की, मासिक पाळीविषयीच्या अंधश्रद्धा व जुन्या अनिष्ट रुढी परंपरेच्या कचाट्यातून किशोरवयीन मुलींना मुक्त करण्याची गरज आहे. या नैसर्गिक प्रक्रियेच्या आरोग्यदायी व्यवस्थापनापासून मुलींना थांबविले जाते. मुलींमध्ये लज्जेची भावना व संकोच निर्माण होऊन मुलींचे खच्चीकरण होते. मासिक पाळी ही महिला व मुलींच्या आरोग्य व जीवनशक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्देशांक आहे. म्हणून हा विषय फक्त कुजबूजण्यासाठी नसून त्यावर उघडपणे बोलण्याची गरज आहे. मासिक पाळी दरम्यान मुली शाळेत जात नाहीत, मग सवयीने त्या शाळा सोडतात, त्यासाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ हा कार्यक्रम राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. खासदार अरविंद सावंत यांनी ‘मासिक पाळी’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात येणे गरजेचे असल्याचे सांगून या विषयाच्या जनजागृतीसाठी महिला बचतगटांना सहभागी करून घ्यावे. या कार्यक्रमात युनिसेफच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ठाणे व जालना जिल्ह्यातील कामाबाबत ‘आता तुझी पाळी’ हा माहितीपट दाखविण्यात आला. ठाणे, जालना, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना गौरविण्यात आले. यावेळी ‘मासिक पाळीबाबत माझे मत’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
मुलींसाठी औषधे उपलब्ध व्हावीत
शाळेमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय असणे हे मासिक पाळी व्यवस्थापनासाठी मदतीचे ठरेल. त्याचबरोबर मुलींच्या मासिक पाळीच्या काळात शाळेत चेंजिंग
रूम, मुलींचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठीची औषधे उपलब्ध करून देण्याची संकल्पना हाती घेणे गरजेचे असल्याचे मुंडे यांनी सांगितले.