परिवहनचे लवकरच आॅटोमोबाइल अभियांत्रिकी महाविद्यालय - दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:00 AM2017-11-12T03:00:19+5:302017-11-12T03:02:10+5:30
परिवहन महामंडळाचे आॅटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून त्यात कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी २५ टक्के जागा असतील. मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा २५ टक्के जागा कर्मचाºयांसाठी राखीव राहतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
वर्धा : परिवहन महामंडळाचे आॅटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून त्यात कर्मचा-यांच्या पाल्यांसाठी २५ टक्के जागा असतील. मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा २५ टक्के जागा कर्मचा-यांसाठी राखीव राहतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
शनिवारी वर्धेत नव्या अत्याधुनिक बसस्थानकाच्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी मंत्री दिवाकर रावते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, बसस्थानकांचे बांधकाम आता ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर करण्यात येणार नाही. परिवहन महामंडळच यापुढे सर्व बस स्थानके बांधणार आहे. सध्या त्यासाठी ८५ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असून यापैकी ४८ कोटींची बसस्थानके केवळ विदर्भात निर्माण होत आहेत. तसेच ३ हजार ५०० प्रवासी निवारे बांधण्यात येणार आहे. बसस्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी खासगी संस्थांची नेमणूक केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.