खासगी महाविद्यालयात बी.एड्. प्रवेश प्रक्रिया रखडली

By admin | Published: July 12, 2015 10:51 PM2015-07-12T22:51:36+5:302015-07-12T22:51:36+5:30

अनुदानित महाविद्यालयात प्रक्रिया सुरू : दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामुळे अडचणीत

B. Ed in the private college Access process retreated | खासगी महाविद्यालयात बी.एड्. प्रवेश प्रक्रिया रखडली

खासगी महाविद्यालयात बी.एड्. प्रवेश प्रक्रिया रखडली

Next

सदानंद र्औधे -मिरज -राज्यात या वर्षीपासून बी. एड्. अभ्यासक्रम दोन वर्षांचा केला असताना, खासगी महाविद्यालयातील बी. एड्. प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. केवळ शासकीय बी. एड्. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, खासगी संस्थाचालकांत प्रवेश परीक्षेबाबत वाद असल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली.
राज्यात २८९ विनाअनुदानित बी. एड्. कॉलेज व १३० अनुदानित व शासकीय बी. एड्. कॉलेज आहेत. विनाअनुदानित व अनुदानित महाविद्यालयात प्रवेशासाठी दरवर्षी वेगवेगळी प्रवेश परीक्षा होते. दरवर्षी फेब्रुवारीत प्रवेश नियंत्रण समितीकडून संघटनेच्या प्रवेश प्रक्रियेस मान्यता देण्यात येते. मे अखेर प्रवेश परीक्षा पूर्ण होऊन जुलैपासून बी. एड्. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र, यावर्षी जुलै महिन्यातसुद्धा खासगी महाविद्यालयातील बी. एड्. प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झालेला नाही. २००४ पासून विनाअनुदानित बी. एड्. कॉलेज संस्थाचालकांच्या संघटनेतर्फे प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. दरवर्षी सुमारे ३० हजार विद्यार्थी बी. एड्.ची प्रवेश परीक्षा देतात. शुल्क म्हणून जमा होणाऱ्या रकमेत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संघटनेच्या मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेचे संचालक देवेंद्र जोशी व सचिव रमजान शेख यांना निलंबित केले आहे. जोशी व शेख यांनी नवीन कार्यकारिणी स्थापन करून प्रवेश परीक्षेचा दावा केल्यामुळे शासनाने प्रवेश प्रक्रियेचे निर्देश दिलेले नाहीत.


दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला विरोध
न्या. वर्मा कमिटीच्या शिफारशीनुसार या वर्षापासून बी. एड्.चा अभ्यासक्रम दोन वर्षांचा केला आहे. बी. एड्.च्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात नृत्य, नाट्य व सांस्कृतिक विषय वाढविले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांची एक तुकडी शंभराऐवजी ५० केली आहे. राज्यात ३ लाख बी.एड्.धारक बेरोजगार असताना विद्यार्थी मिळणे मुश्किल होत आहे. गतवर्षी अनेक जागा रिक्त होत्या. बी. एड्. दोन वर्षांचे झाल्यामुळे शिक्षकांची संख्या व पगारावरील खर्च वाढणार आहे. बी. एड्.साठी ३५ ते ५५ हजार रुपये एका वर्षाचे शुल्क आहे. विद्यार्थ्यांना आता दोन वर्षांचे शुल्क भरावे लागणार असल्याने बी. एड्. ला विद्यार्थी मिळणार नाहीत व त्यामुळे खासगी बी. एड्. कॉलेज बंद पडण्याची संस्थाचालकांना भीती आहे.
प्राधिकरणास विरोध
पुढील वर्षापासून संस्थाचालक संघटनेची प्रवेश परीक्षा रद्द होऊन विनाअनुदानित महाविद्यालयांतील बी. एड्. प्रवेश परीक्षा शासनामार्फतच होणार आहेत. अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात सर्व प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्राधिकरणाच्या स्थापनेचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून प्राधिकरणामार्फत प्रवेश परीक्षा होणार आहे. खासगी महाविद्यालयांच्या संघटनेचा प्रवेश परीक्षेसाठी शासकीय प्राधिकरणास विरोध असून, याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गजेंद्र ऐनापुरे यांनी सांगितले.

Web Title: B. Ed in the private college Access process retreated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.