डिजिटल सातबारामध्ये पुणे जिल्हा मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 04:58 PM2018-10-05T16:58:31+5:302018-10-05T17:12:41+5:30
पुणे जिल्ह्याने सुरुवातीला सातबारा संगणकीकरणाच्या कामात आघाडी घेतली होती. मात्र, जिल्ह्याची सध्याची कामगिरी नीचांकी असल्याचे दिसून येत आहे.
पुणे : सातबारा संगणकीकरण या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू केला आहे. पुणे जिल्ह्याने सुरुवातीला संगणकीकरणाच्या कामात आघाडी घेतली होती. मात्र, जिल्ह्याची सध्याची कामगिरी नीचांकी असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने केलेल्या घोषणेनुसार १ मे पासून राज्यात डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्याची योजना सुरू केली आहे. सातबारा संगणकीकरणात चावडी वाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, आॅनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा असे विविध टप्पे केले आहेत. गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यात दोन वतुर्ळाकार रस्ते, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रोच्या तीन मार्गिका अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील जमिनींना चांगलाच भाव आला. त्याचा फायदा घेवून बांधकाम क्षेत्रातील दलालांनी एक, दोन गुंठ्यांच्या जमिनी गुंतवणूकदारांना विकल्या. त्यामुळे अनेक खातेदार निर्माण झाले आहेत. परिणामी संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, खेड तालुक्यांमधील एका सातबारा उताºयावर शंभरपेक्षा अधिक खातेदारांची नावे आली.परिणामी जिल्ह्यातील तालुक्यांची कामे संथगतीने सुरू राहिली. तुकडा बंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा विकता येत नाही. मात्र, तरी देखील शहरालगतच्या गावांमध्ये जमिनींचे तुकडे करून मोठ्या प्रमाणात विकण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अकरा तालुक्यात आतापर्यंत केवळ एक लाख १७ हजार सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले असून त्याची आकडेवारी केवळ १४.६३ टक्के एवढी आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यात प्रांत, मंडलअधिकारी, तहसीलदार यांना सातबारा संगणकीकरण आणि स्वाक्षरीयुक्त साताबारा उताऱ्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार कामे सुरू आहेत, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.
-----------
स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्याची जिल्ह्याची तालुका निहाय आकडेवारी
तालुका चालू सर्वेक्षण क्रमांक डिजिटल सातबारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त
जुन्नर १,५३,५८९ १० ११
पुरंदर १,०५,८११ १३ १३
वेल्हा ५४,९१५ ५,३५२ ५,३६२
भोर १,११,८८० १८ १९
बारामती ७९,४८७ १९,८३० १९,९०८
इंदापूर ८३,९३७ १६,७१७ १६,७१९
आंबेगाव १,१८,३४० ० ०
शिरूर १,१७,७९३ ५६९ ५७१
मावळ ९६,१०७ २६,८०७ २६,८११
मुळशी १,२०,८५७ ४३,६७२ ४३,६७२
दौंड ८२,०२४ ४,०१२ ४०१२
एकूण ११,२४,७४० १,१७,००० १,१७,१०२