नवाजुद्दीन साकारणार बाळासाहेब ! टीझर झाला लाँच : 23 जानेवारीला रीलीज होणार सिनेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:58 AM2017-12-22T03:58:18+5:302017-12-22T04:02:45+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाचा गुरुवारी टीझर लाँच करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ रोजी रीलीज होणार आहे. बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी साकारणार आहे.
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाचा गुरुवारी टीझर लाँच करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ रोजी रीलीज होणार आहे. बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी साकारणार आहे.
याप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांसोबत जास्त काळ व्यतित केला आहे, त्यांना मी जास्त ओळखतो. त्यांच्या आयुष्यात असे बरेच आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवले जाऊ शकते. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा सिनेमा लोकप्रिय व्हावा असे वाटते. तर हा सिनेमा फक्त माझ्या वडिलांवर नाही, तर ज्या व्यक्तीने इतिहास घडवला त्या व्यक्तीवर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य तीन तासांत सामावू शकत नाही, त्यासाठी खरे तर वेबसीरिज काढली पाहिजे, असे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले. ते म्हणाले, बाळासाहेब यांच्यासोबत जवळचे संबंध होते. त्यांनी नेहमीच मला त्यांच्या कुटुंबाचा भाग समजले. ज्या वेळी माझे लग्न झाले, त्या वेळेस त्यांनी पत्नीसह मला मातोश्रीवर बोलाविले होते.
त्याप्रसंगी माँसाहेबांनी जयाचे सुनेप्रमाणे स्वागत केले होते. बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना रुग्णालयात भेटायला गेलो असताना त्या खोलीत माझा फोटो होता, तो पाहून अक्षरश: कृतज्ञ झालो, अशा शब्दांत बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेना नेते संजय राऊत या चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजित पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्षे लागली.
...अन् नवाजुद्दीन मराठीत बोलला-
टीझर लाँचिगवेळी नवाजुद्दीन सिद्दिकी उपस्थित नव्हता. मात्र, त्याने व्हिडीओच्या माध्यमातून चित्रपटाविषयी आणि बाळासाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी चक्क त्याने मराठीतून संवाद साधत ‘मला मराठी चांगलं बोलता येतं’ असे आर्वजून नमूद केले.