"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:45 PM2024-04-27T15:45:07+5:302024-04-27T15:45:54+5:30

Ajit Pawar on Shrinivas Pawar : सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलेल्या विरोधाबाबत अजित पवार यांनी आता मौन सोडलं आहे. श्रीनिवास पवारांनी उमेदवार बदलण्यास सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

Baramati Loksabha Election Why did brother Srinivas pawar go against ajit Pawar | "तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा

"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा निवडणुकीत आता संपूर्ण पवार कुटुंब उतरलं आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीमुळे पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता श्रीनिवास पवार हे त्यांच्या विरोधात का गेले याबाबत अजित पवारांनी खुलासा केला आहे. सख्ख्या भावाने केलेल्या विरोधाबाबत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे.

झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना श्रीनिवास पवार यांच्याबाबत विचारण्यात आलं होतं. उमेदवार बदल तरच सोबत राहील असे श्रीनिवास यांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. मात्र उमेदवार कोण द्यायचा हा आमचा अधिकार आहे असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.

काय म्हणाले अजित पवार?

"श्रीनिवास पवारांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्यासोबत राहीन. पण तू उमेदवार बदल मी तुझ्यासोबत राहीन. माझं असं म्हणणं आहे की, राजकाराणामध्ये आम्ही लोक आहोत. कुणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय आम्ही घेऊ. पण त्यांनी मला दोन तीन वेळा सांगितले की उमेदवार बदल मी उद्यापासून तुझं काम करेल. त्याचा अर्थ मला कळला नाही म्हणून मी त्याला विचारलं. तो म्हणाला बाकी मला काही विचारू नको मला तुला एवढंच सांगायचं आहे," असं अजित पवार म्हणाले.

बाहेरचे पवार म्हटल्याने अजित पवार व्याकूळ

“शरद पवारांनी बाहेरचे पवार असा उल्लेख केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच नाराज झाले आहेत. तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता, महिलांच्या बद्दल बरचं काही बोलता आणि एकीकडे 40 वर्षे घरात असलेल्या सूनेला बाहेरची समजता. याच्यावरुन लोकांना काय समजायचं ते लोक समजले आहेत. हा एकप्रकारे सगळ्या सुनांचा अपमान आहे. बाहेरची म्हणत असताना आजूबाजूला खिदळणाऱ्यांनाही त्यांच्याही घरात सून असेल याचं तारतम्य नव्हतं. हे कशाचं द्योतक आहे. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात यामुळे पाणी आलं,” असंही अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते श्रीनिवास पाटील?

"दादांच्या विरोधात कसा काय आलो याचं आश्चर्य वाटलं असेल. दादांच्या चांगल्या आणि वाईट काळात मी त्यांच्यासोबत होतो. त्यांनी जे निर्णय घेतले त्यात मी साथ दिली. भाऊ म्हणून त्यांनी सांगितले तिथे उडी मारली. कधी काही विचारलं नाही. पण आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा माझं म्हणणं होतं की आमदारकीला तू आहेत तर खासदारकी साहेबांकडे दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. साहेबांची वय आता 83 झाल्यामुळे या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला. कारण पुढची 10 वर्षे दुसऱ्या व्यक्तीकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे," असे श्रीनिवास पवार यांनी म्हटलं होतं.

Web Title: Baramati Loksabha Election Why did brother Srinivas pawar go against ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.