कोल्हापूर, पुण्यात फिरते खंडपीठ
By Admin | Published: March 23, 2016 07:28 PM2016-03-23T19:28:11+5:302016-03-23T19:28:11+5:30
सातत्याने होणा-या मागणीचा विचार करून कोल्हापूर व पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्यास मान्यता मिळावी, अशी शिफारस राज्य सरकारने उच्च
- मुख्यमंत्र्यांची माहिती: न्यायाधीशांची रिक्त पदे भरणार
मुंबई : सातत्याने होणा-या मागणीचा विचार करून कोल्हापूर व पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्यास मान्यता मिळावी, अशी शिफारस राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
विविध भागात खंडपीठ स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्र्तींची समिती स्थापन केली असून या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. खंडपीठ स्थापन करण्यास बराच कालावधी लागू शकतो, ही बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने प्रलंबित खटल्यांची संख्या व मुंबई शहरापासूनचे अंतर आणि लोकसंख्या या निकषांवर कोल्हापूर व पुण्यात फिरते खंडपीठ देण्याची मागणी केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
न्यायाधीशांची १७९ रिक्त पदे भरणार
राज्यातील न्यायाधीशांची १७९ रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यापैकी उच्च न्यायालयाच्या स्तरावरील ३५ पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. न्यायाधीशांच्या पदांसाठी ४८ कोटी २३ लाखांचा आवर्ती व १७ लाख ७३ हजाराचा अनावर्ती खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)