कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार, संग्रामसिंह देशमुख उद्या अर्ज भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:49 PM2018-05-09T15:49:35+5:302018-05-09T15:54:24+5:30
कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सांगली : कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या सध्या ते पार पाडत आहेत. माजी आमदार दिवंगत संपतराव देशमुख यांचे ते चिरंजीव आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत बंधू आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. रिक्त झालेल्या जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांना काँगेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कडेगाव यांच्याकडे विश्वजीत कदम यांचा अर्ज दाखल करताना माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार सतेज पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार निरंजन डावखरे, खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, विजयमाला कदम, स्वप्नाली विश्वजीत कदम उपस्थित होते. यावेळी विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दर्शवला आहे. भाजप या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार कि, पाठिंबा देणार याची चर्चा होती, परंतु या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने उमेदवार न देता, ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती.
ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे. पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.