‘एमआयएम’ला भाजपाची जाणीवपूर्वक शक्ती - पवार
By admin | Published: February 9, 2015 06:11 AM2015-02-09T06:11:17+5:302015-02-09T06:11:17+5:30
‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत
पुणे : ‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत असून, देशाच्या ऐक्याला सुरूंग लागणार आहे. हे ध्यानी घेऊन मुस्लीम समाजालाबरोबर घेऊन त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.
राष्ट्रवादी प्रतिनिधी संमेलनाच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, व अन्य नेते उपस्थित होते.
‘एमआयएम’ ही हैदराबादमधील एक संघटना आहे. मात्र, नांदेडमध्ये यश मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्रात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम तरुण त्याकडे आकर्षित होत आहेत. हा काळ आव्हानात्मक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी संरक्षणमंत्री असताना बाबरी मशिदीचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न काही संघटनांनी केला होता, असे नमूद करतानाच, भाजपाकडून आताही घरवापसी, नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण व शैक्षणिक अभ्यासक्रमांचे भगवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसची पोकळी भरून काढा !
विरोधक म्हणून आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस कमी पडत आहे. दिल्लीच्या निवडणुकीतही काँग्रेस कमजोर दिसत आहे. त्यामुळे ही पोकळी राष्ट्रवादीने भरून काढावी; याला महाराष्ट्रातून सुरवात केली पाहिजे, असे पवार म्हणाले. आपण सत्तेत नसून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडून इतिहास घडविण्याचे पाईक होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी लागावे, असे आवाहन पवार यांनी केले.
मोदी यांचा थेट उल्लेख टाळला
येत्या १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची बारमती येथे भेट होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीची उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण भाजपा आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले.
या संमेलनातही राष्ट्रवादीतील अनेक माजी मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर थेट टीका केली. त्यामुळे समारोपाच्या भाषणात त्याविषयी पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती. तब्बल एक तास दोन मिनिटांच्या भाषणात पवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. परंतु, मोदी यांच्याविषयी एकही शब्द उच्चारला नाही.