पन्नास वर्षे सत्तेत राहण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला पराभवाच्या भीतीने ग्रासलेय, अशोक चव्हाणांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:52 PM2019-04-23T16:52:24+5:302019-04-23T16:53:21+5:30
२०१४ च्या निवडणुकीनंतर एकापाठोपाठ विजय मिळवत गेलेल्या भाजपला आता लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे.
मुंबई - २०१४ च्या निवडणुकीनंतर एकापाठोपाठ विजय मिळवत गेलेल्या भाजपला आता लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सभांना मिळत असलेला अल्प प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष जनतेला पाच वर्षातच नकोसा झाल्याचे चित्र दिसत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी,अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विविध सभांना अल्प प्रतिसाद मिळाला. मोदींच्या बहुतांश सभा सुरु असतानाच लोक निघून जात असल्याचे चित्र दिसले. मोदींच्या सभेसाठी काळे कपडे घालणाऱ्यांना सभेत प्रवेश दिला नाही, पाण्याच्या बाटल्याही लोकांना सभास्थानी नेण्यास मज्जाव केला. ते कमी होते की काय म्हणून नाशिक जिल्ह्यातील मोदींच्या सभेत जाणाऱ्या लोकांकडील चुन्याच्या डब्याही काढून घेण्यात आल्या, हे सर्व पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे, असे चव्हाण म्हणाले.
नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सभांना प्रतिसादच मिळत नसल्याने भाजपचे उमेदवारही चिंताग्रस्त झाले आहेत. याउलट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपची डोकेदुखी जास्तच वाढली आहे. पाच वर्षातच जनता भाजपकडे पाठ फिरवत असल्याचे पाहून भाजप नेत्यांचेही ताळतंत्र सुटत चालले आहे, तसेच भाजप नेते खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत हेही लोकांना आवडले नाही. विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेले नरेंद्र मोदी आता विकासाच्या मुद्यावर बोलू शकत नाहीत. पन्नास वर्षे सत्तेत राहू अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजपला ही मोठी चपराक असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.