भाजप सरकारच पुन्हा सत्तेवर येईल; मात्र सातत्याने अडचणी येणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:57 PM2019-05-13T15:57:58+5:302019-05-13T16:02:07+5:30
मोहोळच्या नागनाथ यात्रेतील भाकणूक; यंदा पाऊस समाधानकारक, चारा मुबलक प्रमाणात होणार उपलब्ध
मोहोळ : देशाच्या राजकारणात प्रचंड घुसळण होऊन, विचार मंथनाने हेच सरकार पुन्हा सत्तेत येईल. असे असले तरी त्यांना सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागेल. यंदा पाऊस समाधानकारक असल्याची भाकणूक नागनाथ महाराजांचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी मुख्य दिल्ली दरवाजात केली.
हजारो भाविकांचे ग्रामदैवत असणाºया श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेत मुख्य आकर्षण असणाºया गणासह खर्गाची सवाद्य मिरवणूक पालखीसह काढण्यात आली. यावेळी श्री नागनाथ महाराजांचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्याद्वारे यावेळी मंदिराच्या मुख्य दरवाजात देशातील परिस्थितीवरील भाकणूक करण्यात आली.
खर्गतीर्थामध्ये नागनाथाचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज व अरुण बुवा मोहोळकर यांचा गुरु-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भर उन्हात महिलांसह हजारो नागेश भक्तांनी खर्गतीर्थावर गर्दी केली होती. संत मंडळींचे भजन, गुरु-शिष्य भेटी दरम्यान केली जाणारी पुष्पवृष्टीसह टाळ्याच्या गजरात केलेला जयघोषामुळे भर उन्हात सुद्धा हा सोहळा पाहताना आबालवृद्ध तल्लीन झाले होते.
यात्रेच्या निमित्ताने शनिवारी भिकलिंग महाराजांच्या भेटी सोहळ्यानंतर नयनरम्य शोभेचे दारूकाम झाले. वाढत्या गर्दीमुळे चालूवर्षी शोभेच्या दारूच्या ठिकाणी महिलांची बैठक व्यवस्था स्वतंत्र केल्यामुळे महिलांची गर्दी वाढली होती.
यात्रा काळात शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने इलियास शेख, चंदुलाल भिवरे, प्रभाकर.एस. कुलकर्णी, हरी ओम मित्रमंडळ, अविनाश गोडसे, आयुब इनामदार चालक मालक संघटना , ऋणानुबंध संस्था, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार रमेश कदम यांच्या वतीने अनेक नागेश भक्तांनी पाणीवाटपासह अल्पोपहार, मठ्ठा आदींचे वाटप केले.
रोगराई नाही, शांतता नांदेल
खर्गतीर्थामध्ये केलेल्या भाकणुकीत यंदा बेताचा पाऊस असल्याचे सांगण्यात आले. काकडे पारावर रोगराईबाबत केल्या जाणाºया भाकणुकीत रोगराई नसून, शांतता नांदेल असे सांगण्यात आले. मुंगीच्या धोंड्यावर सांगण्यात आलेल्या भाकणुकीत चारा मुबलक प्रमाणात होईल. यंदा खरीप व रब्बीची पेरणी सर्वदूर समाधानकारक होईल असे भाकीत खर्गे महाराज यांनी केले.