साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?; भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 07:33 AM2018-11-14T07:33:18+5:302018-11-14T07:38:28+5:30
राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपाचं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर
मुंबई: व्यंगचित्रातून राज्य सरकारवर वारंवार निशाणा साधणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरेंना आता भाजपानं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणूक जवळ आली असो वा त्या निवडणुकीत मनसेचं पानिपत झालेलं असो, राज ठाकरे फक्त व्यंगचित्रच काढत असतात, असा टोला भाजपानं व्यंगचित्रातून लगावला आहे. महाराष्ट्र भाजपानं ट्विटरवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.
भाजपानं व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंची जोरदार खिल्ली उडवली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाही राज ठाकरे व्यंगचित्र रेखाटण्यात मग्न आहेत, असं व्यंगचित्र भाजपानं प्रसिद्ध केलं आहे. 'साहेब, लोकसभा निवडणूक जवळ आली!', 'साहेब, विधानसभा निवडणूक जवळ आली!', असं मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंना सांगत असतानाही मनसेप्रमुख व्यंगचित्र काढण्यात व्यस्त आहेत. यानंतर कार्यकर्ते 'साहेब, आपल्याला एकही जागा जिंकता आली नाही', असंही राज यांना सांगताना दाखवण्यात आले आहेत. मात्र तरीही राज ठाकरे व्यंगचित्र काढण्यात गढून गेले आहेत. ते कार्यकर्त्यांकडे पाहतदेखील नाहीत, असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्र भाजपानं प्रसिद्ध केलेलं हे व्यंगचित्र अनेकांनी रिट्विट केलं आहे. साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?, असा प्रश्न भाजपानं व्यंगचित्रासोबत विचारला आहे.
साहेबांचे कार्टून की कार्टून साहेब? pic.twitter.com/RMm15ZqhX4
— महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) November 13, 2018
राज्यातील दुष्काळ, मोदींची आश्वासनं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावरील कोट्यवधींचा खर्च, सीबीआयमधील वाद यासारख्या अनेक मुद्यांवरुन राज ठाकरेंनी आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारवर व्यंगचित्रातून हल्ला चढवला आहे. दिवाळीत राज ठाकरेंनी मोदी आणि फडणवीस सरकारला सातत्यानं लक्ष्य करत फटाके फोडले होते. त्यांच्या व्यंगचित्रांना सोशल मीडियाकडून चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता. कालच राज ठाकरेंनी अवनी वाघिणीच्या हत्येवरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं.