भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 01:10 PM2019-05-09T13:10:54+5:302019-05-09T13:13:09+5:30
प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना दिली भेट
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. मंगळवेढ्यातही अशीच परिस्थिती आहे. स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने चारा छावण्या उभारल्या आहेत. स्थानिक पातळीवर निधी जमा करुन चारा खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना अद्याप अनुदान आलेले नाही. शासनाने चाºयाचा दरही ठरविलेला नाही. उसाचा चारा उपलब्ध आहे. परंतु, तो सुकलेला असल्याने गुरांच्या जिभेला चिरा पडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या नादात भाजप आणि शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते़ पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, चारा छावण्यांमध्ये जनावरांसोबत प्रत्येक घरातील एक माणूसही मुक्कामाला आहे. रोजगार हमी योजनेखाली या माणसाची नोंद करुन त्याला मदत मिळायला हवी. चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे ही चूक आहे. हैदराबादला चारा चांगला चारा मिळतो. राज्य सरकारने दुष्काळासाठी विशेष निधीची तरतूद करावी. जिल्हाधिकाºयांना ठराविक दुष्काळ निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी. दुष्काळासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आम्ही ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
धरणे, तलावांतील गाळ काढा
- दुष्काळाच्या परिस्थितीत धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. या परिस्थितीत त्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. त्यासाठी जेसीबी आणि पोकलेन यांचे अधिग्रहण करुन ठेवण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले.