'भाजपा-शिवसेना नेते आता 'ताट-वाट्या' घेऊन फिरायलेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:28 PM2019-10-16T21:28:47+5:302019-10-16T21:31:00+5:30
शिवसेना म्हणते आम्ही 10 रुपयात तुम्हाला जेवण देणार, तर ते म्हणतात नाय नाय
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपा-शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. भाजपासोबतच्या युतीत शिवसेना सडली असं म्हणून पुन्हा त्याच भाजपाशी युती करणाऱ्या शिवसेनेला राज यांनी नाशिकमधील सभेत फैलावर घेतले. निवडणुकांचा हंगाम सुरू असून भाजपा-शिवसेना ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याचा टोला राज यांनी लगावला. तसेच काश्मीरमधील कलम 370 वर बोलण्यापेक्षा मुद्द्यांवर बोला. तरुणांच्या जाणाऱ्या नोकऱ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोला, असंही ते पुढे म्हणाले.
शिवसेना म्हणते आम्ही 10 रुपयात तुम्हाला जेवण देणार, तर ते म्हणतात नाय नाय, आम्ही 5 रुपयात देणार. जणू काय महाराष्ट्र भिकेलाच लागलाय, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपावर सडकून टीका केली. त्यामध्ये, भाजपासोबतची आमची इतकी वर्षे सडली, मोठा-अभिमान-मोठा स्वाभिमान, आठवतीय का ती क्लिप? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही जोरदार प्रहार केला.
सध्या निवडणुकांचा हंगाम सुरू असून भाजपा-शिवसेना ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याचा टोला राज यांनी आपल्या नाशिक येथील सभेत लगावला. राज यांच्या या टोल्यानंतर सभेला उपस्थित नागरिकांना उत्स्फुर्तपणे दाद दिली. शिवसेनेच्या 10 रुपयांच्या थाळीवरुन आणि भाजपाच्या 5 रुपयांच्या अटल आहार योजनेवरुन दोन्ही पक्षांना चपराक लगावली. तसेच, महाराष्ट्र काय भिकेला लागलाय का? असा सवालही राज यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.