विरोधकांच्या संविधान रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपाची तिरंगा रॅली, मुख्यमंत्री करणार समारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 03:33 PM2018-01-26T15:33:06+5:302018-01-26T15:33:47+5:30
विरोधकांनी 'संविधान बचाव रॅली' काढल्यानंतर सत्ताधारी भाजपाने त्याला तोंड देण्यासाठी 'तिरंगा रॅली' काढली आहे.
मुंबई- विरोधकांनी 'संविधान बचाव रॅली' काढल्यानंतर सत्ताधारी भाजपाने त्याला तोंड देण्यासाठी 'तिरंगा रॅली' काढली आहे. या तिरंगा रॅलीवर विरोधकांनी टीका केली आहे. तिरंगा रॅली मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
या रॅलीत मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार देखील सहभागी झालेत. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून, भाषणही दिलं जाणार आहे. आज दुपारी दोन वाजल्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीनं मार्गक्रमण सुरू केलं आहे. ही रॅली शिवाजी पार्कपासून माटुंगा, रुपारेल कॉलेजजवळून सेनापती बापट मार्गे दादर रेल्वे स्टेशन ते फुल मार्केटकडून पुढे एलफिन्स्टन रोड आणि हुतात्मा बाबू गेनू क्रीडांगण(कामगार मैदान)पर्यंत जाणार आहे, त्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे.
तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी भाजपाविरोधी संविधान बचाव रॅलीही सुरू आहे. या रॅलीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय. आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया अशी ही रॅली काढण्यात आली आहे. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली असून, रॅलीमध्ये कोणल्याही प्रकारची घोषणाबाजी केली जात नाहीये. घोषणाबाजी न करता विरोधकांनी मूक रॅली काढली आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, खासदार राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय हार्दिक पटेल, शरद यादव, ओमर अब्दुल्ला, सीताराम येचुरी यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही रॅलीत सहभागी झाले.