विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 05:23 AM2024-05-16T05:23:11+5:302024-05-16T05:25:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण, नाशिक येथे सभा तर मुंबईत रोड शो, धर्माधारित बजेटवरून विरोधकांवर टीकास्त्र
लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई/कल्याण/नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अखेरच्या टप्प्यात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण व नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा झाल्या, तर मुंबईतील घाटकोपरमध्ये त्यांनी रोड शो केला. नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांच्या तोंडातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल पाच गौरवपर वाक्ये वदवून घ्यावी, असे आव्हान मोदींनी कल्याणमधील सभेत दिले. तर नाशिकच्या सभेत त्यांनी कांदा आणि द्राक्ष पिकांच्या मुद्द्याला हात घालत ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार असल्याची घोषणा केली.
दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे तर, कल्याण व भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्रीकांत शिंदे, कपिल पाटील यांच्या प्रचाराकरिता कल्याणमधील व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील इतर नेते उपस्थित होते.
सत्ता स्थापन झाल्यावर १०० दिवसांत काय करायचे याची ब्लू प्रिंट माझ्याकडे आहे. देशातील तरुणांकडे विकासाच्या नवनवीन कल्पना असल्याने त्यांनी त्या आपल्याला कळवाव्या. १२५ दिवसांत आपण नियोजन करून २०४७ सालाच्या पूर्वीच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
‘ऑपरेशन ग्रीन’ पुनश्च राबविण्याची घोषणा
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी कांदा प्रश्नाविषयीची भूमिका स्पष्ट केली. ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत कांदा निर्यातीत ३५ टक्के इतकी वाढ झाली असून निर्यात बंदी उठविल्यानंतर २२ हजार मेट्रिक टन पेक्षा अधिक निर्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ५ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच केंद्राने प्रथमच बफर स्टॉक बनविण्याची व्यवस्था उभी केली. यापूर्वीच्या सरकारमध्ये अशी व्यवस्था नव्हती, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
ट्वेन्टी फोर बाय सेव्हन फॉर ट्वेन्टी फोर्टी सेव्हन...
देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पुढील पाच वर्षांत कोणते निर्णय घ्यायचे याबाबत देशातील तरुणांनी पुढील १२५ दिवसांत मला सूचना कराव्या. भारताला २०४७ पूर्वीच विकसित राष्ट्र करण्याकरिता ट्वेन्टी फोर बाय सेव्हन काम करणार आहे, असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी कल्याणच्या सभेत व्यक्त केला.
मुस्लीम तुष्टीकरणाची काँग्रेस प्रयोगशाळा
मोदी म्हणाले की, काँग्रेस नेहमीच मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे राजकारण करीत आली आहे. यूपीए सरकारने मुस्लिमांकरिता १५ टक्के बजेट तयार केले होते. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. धर्माधारित बजेटला सगळ्यात प्रथम मी विरोध केला. कर्नाटक ही काँग्रेसची मुस्लीम तुष्टीकरणाची प्रयोगशाळा असल्याचा उल्लेख त्यांनी केला.