बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला; वरळी कोळीवाडा समुद्र किनारी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 08:45 AM2017-08-31T08:45:56+5:302017-08-31T10:08:12+5:30
मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या डॉ.अमरापूरकर यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळते आहे.
मुंबई, दि. मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या डॉ.अमरापूरकर यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळते आहे. गुरूवारी सकाळी वरळी कोळीवाडा समुद्र किनारी डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला आहे. वरळी कोळीवाडा परिसरातील काही लोकांना समुद्र किनारी एक मृतदेह आढळून आल्यावर त्यांची पोलिसांना याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तो मृतदेह डॉ. अमरापूर यांचा असल्याचं आढळून आलं आहे. वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेला मृतदेह हा डॉ. दीपक अमरापूरकर यांचा असल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा समुद्रात वाहून आला.
मुसळधार पावसामुळे 29 ऑगस्टला मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी 4.30 च्या सुमारास प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते. लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकरांचा विचार होता. एलफिन्स्टन पश्चिम भागात त्यांनी आपली गाडी सोडली होती. गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत.
पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचं झाकण काढलं होतं. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले.
डॉ. दीपक अमरापूरकर यांची ओळख
डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं.
मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत
पत्नीसोबत शेवटचा झाला होता संपर्क
डॉक्टर अमरापूरकर दुपारच्या सुमारास रूग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी पत्नीला फोन करुन घरी पायी चालत येत असल्याची माहिती दिली. अंधारात अमरापूरकर यांना कमी दिसत असल्याने पत्नीनं त्यांना सांगितले की, तुम्ही आहात तिथेच थांबा, मी तेथे पोहोचते. ज्याठिकाणाहून अमरापूरकर वाहून गेल्याची माहिती मिळाली तेथे आसपास परिसरात त्यांची पत्नी पोहोचलीदेखील होती. मात्र प्रचंड प्रमाणात पाणी साचलेले असल्याने पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. त्यावेळी त्यांनी अमरापूरकर यांना फोन केला, मात्र त्यांनी फोनचे उत्तर दिले नाही. दुसरीकडे प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या बहिणीला सांगितले की, एक व्यक्ती याठिकाणाहून वाहून जात होता, आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्नांना यश आलं नाही. आमच्या हातात केवळ त्यांची छत्रीच राहिली. आश्चर्याची बाब म्हणून ज्या ठिकाणाहून डॉ अमरापूरकर बेपत्ता झालेत त्या ठिकाणाहून त्यांचे घर केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. घटनास्थळावर अमरापूरकर यांची केवळ छत्री सापडली व त्यांचा शोध आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.